मीनाक्षी जगदाळे
या लेखामार्फत आपण हे पाहणार आहोत की, पती-पत्नी मग ते अत्यंत गरीब असोत, सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीमधील असोत वा मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय करणारे असोत, नोकरदार असोत वा हातावर पोट असणारे असोत, त्यांच्यामध्ये त्यांच्या घरातील उत्पन्नाचे, खर्चाचे तसेच कोणत्याही लहान-मोठ्या कर्जाचे, उधार उसनवारीचे, देण्या-घेण्याचे आर्थिक व्यवहार यामध्ये पूर्णतः पारदर्शकता असणे आवश्यक आहे. नवरा- बायकोचा प्रपंच जसा प्रेम, विश्वास, काळजी, आदर यावर सुरळीत चालत असतो. त्यासोबतच संसाराला अत्यंत आवश्यक असणारी आर्थिक बाजू देखील खूप महत्त्वाची असते. पती-पत्नींनी घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहार एकमेकांना विश्वासात घेऊन, एकमेकांच्या सल्ल्याने, प्रधान्यक्रम ठरवून, काहीही न लपवता करणे अपेक्षित आहे.
बहुतांश घरांमध्ये पतीला जर पत्नी कमावती असेल तर तिच्या उत्पन्नाबाबत, खर्चबाबत, बचतीबाबत, इन्व्हेस्टमेंटबद्दल सर्व काही ठाऊक असते. अनेक ठिकाणी पेमेंट स्लिप आणि पगार दर महिन्याला पत्नीने पतीच्या हातात द्यावा, असा नियमच असतो. पती मात्र स्वतःची ही सर्व माहिती कधीही घरात कोणालाच देत नाही. पत्नीने कशासाठी, कुठे, किती खर्च करावा हे सुद्धा अनेक घरात मोठी माणसं अथवा नवराच ठरवत असतो, त्यांची पूर्वपरवानगी त्यासाठी आवश्यक असते. गरज पडल्यास पत्नीच्या नावाने कर्ज घेणे, हफ्त्यावर नवीन घरं, गाडी, इतर वस्तू घेणे अडचण असेल, तर तिच्या नावावर गोल्ड लोन अथवा इतर कोणतेही कर्ज प्रकरण करणे हा निर्णय तिला विचारात न घेता तिच्यावर लादला जातो.
अनेक घरांमध्ये असे चित्र बघायला मिळते की, पती अथवा पत्नीच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा अजिबात ताळमेळ नसतो, त्यामुळे घरातील अनेक लोकांवर कर्ज, थकलेले हफ्ते, उधाऱ्या असतात. तेही कमी म्हणून अनेक जणांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडून बिनव्याजी पैसे उचललेले असतात. काही घरात व्याजाने पैसे घेण्याची आणि प्रमाणाबाहेर खर्च करण्याची सवय असते. अनेक ठिकाणी असे व्यवहार एकमेकांना सांगून केलेले नसतात, त्यामुळे जेव्हा कधी हे घेणेकरी समोर येतात आणि सत्य उघडकीला येते तेव्हा संपूर्ण कुटुंबालाच मोठ्या मानहानीला, अपमानाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागत. तू हे सगळं माझ्यापासून का लपवलं, वेळीच का सांगितलं नाही, कुठे खर्च केले इतके पैसे, मला न सांगता कोणाला दिले, या वर्तनामुळे आपल्यासोबत विश्वासघात झाला म्हणून नवरा-बायकोत मोठे कलह निर्माण होतात.
काही घरात पत्नीने देखील पतीपासून लपवून स्वतःच्या माहेरील मंडळींशी, मैत्रिणींशी आर्थिक व्यवहार केलेले दिसतात. आपण कोणाला पैसे देणारे असो वा घेणारे त्याबाबत पतीला पूर्व कल्पना देणे, त्याला विश्वासात घेऊन आर्थिक समस्या सांगणे आपले कर्तव्य आहे. कारण असे लपवलेले व्यवहार जेव्हा अचानक दुसऱ्या व्यक्तिमार्फत घरात समजतात तेव्हा नात्यातील विश्वासाला तडा गेल्याशिवाय राहत नाही.
कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार, आर्थिक नियोजन, स्थावर मालमत्तेविषयक निर्णय, नवीन खरेदी-विक्री, कर्ज प्रकरणे, उत्पन्न त्यातून करावयाचा खर्च याची तपशीलवार माहिती संपूर्ण कुटुंबाला विश्वासात घेऊन सांगणे, एकत्रित निर्णय घेणे सगळ्यांच्याच प्रगतीसाठी, विकासासाठी अपेक्षित आहे. जरी संपूर्ण कुटुंबातील वाद विवाद, मालमत्तेवरून असलेले मतभेद यामुळे एकत्रित चर्चा असफल होत असतील तर निदान घरातील पती-पत्नींनी तरी याबद्दल एकमेकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घेणे आवश्यक आहे जेणेकरून गैरसमज, विश्वासघाताची भावना, संभ्रम त्यांच्या नात्यात निर्माण होणार नाही. पती-पत्नींनी आपापसात हे देखील ठरवलेले असणे आवश्यक आहे की, त्यांच्या घरातील, व्यवसायातील, कुटुंबातील आर्थिक व्यवहार, त्यांच्यामधील चर्चा, निर्णय, नियोजन त्यांच्याकडे असलेले क्रेडिट डेबिट कार्ड त्याचे पिन नंबर, चेक बुक पास बुक, अकाऊंट नंबर घरातील इतर महत्त्वाचे मालमत्ता, आर्थिक बाबतीतील कागदपत्रे, घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या हातात परस्परांच्या परवानगीशिवाय जाणार नाही.
एकमेकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही घराबाहेरील व्यक्तीच्या हातात घरातील आर्थिक कारभार चुकूनसुद्धा जाणार नाही हे देखील महत्त्वाचे आहे. व्यावसायिक असो वा कौटुंबिक पैशाची आवक, जावक याबाबत एकमेकांशी पारदर्शक राहणे महत्त्वाचे आहे. जर नवरा-बायकोमध्ये याबाबत जागरूकता नसेल तर तिऱ्हाईत व्यक्ती या गोष्टीचा पुरेपूर फायदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करू शकते. आपल्या कुटुंबाचे आर्थिक गणित, गरजा, आर्थिक समस्या आपल्या भविष्याची, आपल्या मुला-बाळांच्या भवितव्याची तजवीज पती-पत्नी जितक्या प्रभावीपणे आणि सखोल विचार करून करू शकतात तितकं सक्षम इतर कोणीही नसते. त्यामुळे इतर कोणावर, किती विश्वास टाकायचा, स्वतःच आर्थिक नुकसान अंध विश्वास ठेऊन, भावनेच्या आहारी जाऊन स्वतःच्या हाताने करायचं का? हा लक्षात घेण्यासारखा मुद्धा आहे.
जर आपण घरातील स्त्रीला, सुनेला, पत्नीला, लेकींना लक्ष्मी मानतो तर त्यांना घरातील आर्थिक बाजू सांभाळायला सक्षम बनवणे, त्यांना सर्व व्यवहार समजावून सांगणे, त्याबाबत त्यांच्या मतांना, सल्ल्याना देखील किंमत देणे, शक्य तिथे अंमलबजावणी करणे फायदेशीर आहे. घराबाहेरील अयोग्य, चुकीच्या, आपली फसवणूक करणाऱ्या, चुकीचा हेतू असणाऱ्या लोकांचा याबाबत आधार अथवा सल्ला घेण्यापेक्षा आपल्या गृहलक्ष्मीला हा मान दिला, तर नक्कीच तो साक्षात लक्ष्मीचा आदर असेल.
एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या महिला पुरुष ज्येष्ठ सदस्य यांनी तर आर्थिक बाबतीत एकमेकांना प्रचंड विश्वासात घेणे, कुटुंबातील बाहेरील व्यक्तींपासून सतर्क सावध राहणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील अनेक जण ज्या ठिकाणी ऐका छताखाली राहत आहेत तिथे आर्थिक विषय अतिशय संवेदनशील असतो. घरातील प्रत्येक महिला पुरुष वेगवेगळ्या मतांचे, विचाराचे असतात. इतर कोणत्याही निर्णयात हा वैचारिक मतभेद तितका परिणामकरक नसतो पण पैशाचा प्रश्न असला की कटुता, असुया, मत्सर, आर्थिक खच्चीकरण, आर्थिक परवलंबित्व या भावना मनात घर करू लागतात. आर्थिक नुकसान, आर्थिक पेच, मालमत्तेबाबत त्यागाची भूमिका, हक्क सोडणे, घरातील एखादा तोट्यात जाणे कोणाच आर्थिक नुकसान होणे, त्यातून दुखावलेली आणि दुरावलेली मने कौटुंबिक क्लेश तयार करतात.
म्हणूनच संपूर्ण घराला ऐका साच्यात बांधून ठेवणारी, एकत्र आणि संघटित ठेवणारी घरातील महिला अशा आव्हानांना नक्कीच सामोरं जाऊ शकते आणि त्यातून योग्य मार्ग काढू शकते. कुटुंबाला सर्व बाजूनी बांधून ठेवण्याची जी शक्ती घरातील मुख्य स्त्रीमध्ये आहे ती इतर कोणात असत नाही. स्वतःचा मतलब साधून घेणार नाही यासाठी आपल्या कुटुंबाला, एकमेकांना प्रचंड विश्वासाने हाताळणे क्रमप्राप्त आहे आणि यामध्ये पती-पत्नीची एकत्रित भूमिका खूप महत्त्वाची आहे.