भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा सल्ला
मुंबई : ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली, अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरू आहे, हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय, म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होते आहे, त्यांनी ‘धौती योग’ घ्यावा, असा सल्ला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.
भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आली आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग लावले नाहीत, अशी टीका शेलार यांनी केली.
आम्ही म्हणजेच उत्सव, अशा थापा मारणाऱ्यांकडे आता ‘थापा’ही राहिला नाही आणि उत्सवही, असाही टोमणा शेलार यांनी मारला. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन पेंग्विन सेनेचे गर्वहरण केले. त्यावेळी मात्र त्यांना जळजळ व्हायला लागली. गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, असेही शेलार म्हणाले.