Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनिसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

ठाणे (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीवर संकट कोसळले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून भात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

मागील काही दिवस सतत पावसाने ठाणे व पालघर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे, तसेच ढगाळ वातावरणामुळे भात शेती संकटात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड तर पालघरमधील बोईसर पूर्व, वाणगाव, शिगाव, ऐना, दाभोण, उर्से येथील भातपिकात पावसाचे पाणी शिरल्याने पिकाची नासाडी झाली आहे. शेतशिवारामध्ये पाणी साचून राहिले आहे. भाताच्या आव्यांमध्ये पाणीच पाणी झाल्याने लोंबीतले दाणे कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे.

पालघर शहरासह जिल्ह्यात सगळीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. या अतिपावसामुळे शेतात पाणी साचून नुकसान होण्याची वेळ आली आहे. उभ्या शेतातील भाताच्या लोंब्यात तांदळाचा दाणा तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत पावसामुळे अडथळे येत आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर दाणे, भाताच्या लोंब्या सारेच कुजून जाण्याची शक्यता आहे.

यंदा खरेतर सगळीकडे चांगले भातपीक डोलताना दिसत होते. मात्र मध्येच मुक्कामास आलेल्या पावसाने शेतकऱ्याचा जीव टांगणीला लावला आहे. आता पावसातील शेवटचे नक्षत्र हत्ती आणि चित्ता यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे जनजीवन शेतीवरच अवलंबून आहे. बोईसर पूर्ण येथील वाणगाव भागांत जवळपास १,६०० हेक्टर क्षेत्रात भातशेतीची लागवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी वायएसआर रत्नागिरी ६., कोमल, शुभांगी ९११, गोरक्षनाथ यांच्यासह वेगवेगळ्या संकरित आणि देशी भात बियाण्यांची लागवड केली आहे. परंतु यंदा पावसाचे प्रमाण वाढल्याने काही शेतकऱ्यांनी लवकर केलेल्या शेतीमध्ये प्राधान्याने भातरोपाची लागवड केली होती. सप्टेंबर महिन्यात शेतातील भाताच्या रोपांना लोंब्या आल्या आहेत. मात्र सततच्या पावसात त्याही कुजतील, अशी भीती वाटत आहे. पाऊस असाच पडत राहिला तर वरुणराजा तोंडचा घास हिसकावून घेणार की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -