Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्र

टोमॅटो पिकात मेंढ्या सोडण्याची शेतकऱ्यावर आली वेळ

टोमॅटो पिकात मेंढ्या सोडण्याची शेतकऱ्यावर आली वेळ

मनमाड (वा.) : मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यापासून वाचविलेल्या टोमॅटो पिकाला बाजारात कवडीमोल बाजार मिळत असल्याने उभ्या पिकामध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ पानेवाडीच्या शेतकऱ्यावर आली आहे. अनेक ठिकाणी शेतात साचलेले पाणी, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकांची झालेली पडझड यातून जगविलेल्या पिकांना कवडीमोल बाजारभाव यामुळे उत्तर महाराष्ट्रातील बळीराजाने परिस्थितीपुढे हात टेकल्याचे गावागावामध्ये पहावयास मिळत आहे.

पिकांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव आणि टोमॅटोच्या दरात झालेली घसरण यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने पानेवाडी येथील साहेबराव गंभीर या शेतकऱ्याने चक्क एक एकरातील पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. शेतकऱ्यांवरील संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अतिवृष्टी, निसर्गाचा लहरीपणा त्यात शासनाचा कारभार यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडला आहे. आता पिकविलेल्या शेतमालाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. एकरी ४० हजार रुपये खर्च झालेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने हतबल होत पिकात मेंढ्या सोडण्याचा निर्णय घेतला.

शहर परिसरातील शेतकऱ्यांचा खरीप हंगामात मका, कांदा, बाजरी यांसह इतर पारंपारिक पिके लागवड करण्याकडे जास्त कल असतो. मात्र काही शेतकरी आता वेगवेगळ्या पिकाकडे देखील वळू लागले आहे. पानेवाडी येथील साहेबराव गंभिरे यांनी यंदा कांदे एवजी टोमॅटोला प्राधान्य देत एक एकरात त्याची लागवड केली होती. बियाणे, मशागत, ठिबक, मल्चिंग, खत, औषधे, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, मजुरी आदींसह इतर कामे धरून एकरी किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च या शेतकऱ्याला आला आहे.

सुरवातीला दमदार पाऊस झाला. त्यामुळे पीकदेखील चांगले आले होते. मात्र त्यानंतर सलग मुसळधार पाऊस झाला असून अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाचा फटका इतर पिकासोबत टोमॅटोला देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळे टोमॅटोवर करपासह इतर रोगाच्या विळख्यात सापडून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त टोमॅटो खराब झाले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली एकीकडे उत्पादनात गट तर दुसरीकडे भावात झालेली घसरण यामुळे पिकावर केलेला खरच तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्च निघत नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या साहेबराव यांनी उभ्या पिकात मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला.

Comments
Add Comment