Sunday, April 27, 2025
Homeकोकणरायगडपनवेल उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मिळाला हिरवा कंदील

पनवेल उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मिळाला हिरवा कंदील

२ कोटी ४८ लाख कामांच्या निविदेसाठी सूचना

पनवेल (वार्ताहर) : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपुल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने ०२ कोटी ४८ लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध केली आहे.

नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दुरवस्था झाली होती. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना, सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भर पावसामध्ये पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवला होता. त्यामुळे सिडकोचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून सदरील पुलाच्या दुरुस्तीसाठी आश्वासन दिले होते, तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवारपर्यंत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवड्याभरात या पुलाच्या चारी बाजूंचे काँक्रिटीकरण्याची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले.

त्यानंतर भरपावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या अानुषंगाने सिडकोने ‘न्यू पनवेल आरओबी येथे डेक स्लॅबच्या रिसरफेसिंगसह जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे’ या शीर्षकाखाली ०२ कोटी ४८ लाख ६९ हजार ८३९ रुपयांचे काम करण्यात येणार असून बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -