अलिबाग (प्रतिनिधी) : कोरोना काळात एसटी महामंडळाचा व्यवसाय पूर्णत: बुडाला होता. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे महामंडळाची गाडी कुठे रुळावर आली होती. मात्र जिल्ह्यातील खड्डेअंतर्गत रस्त्यांमुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून मंडळाची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा, तालुका रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे एसटी नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. टायर पंक्चर होणे, स्प्रिंग पाटे तुटणे अशा अनेक प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे एसटी महामंडळाच्या रायगड विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरुड असे आठ एसटी आगार आहेत. आगारातून लांब पल्ल्यापासून तालुका, गाव पातळीवर ४०० हून अधिक बस धावतात. एसटीतून प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी व अन्य प्रवासी सुखरूप व आरामदायी स्वरूपात निश्चितस्थळी पोहोचावे, यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात. काही बस या निमआरामदायी, वातानुकूलित सुरू करण्यात आली आहे. विनाथांबासारख्या सेवाही सुरू केल्या आहेत.
दिवसाला एक लाखापेक्षा अधिक जण प्रवास करतात; परंतु जिल्ह्यातील पनवेल-पेण, पेण-वडखळ, वडखळ-माणगाव, अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा-मुरुड, रामराज- बोरघर अशा अनेक मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून बस चालवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे दिवसाला प्रत्येक आगारात सुमारे ५ पेक्षा अधिक बस पंक्चर होत आहेत. स्प्रिंग पाटे तुटणे, सीट निखळणे असे प्रकार होत असल्याने एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. बसमधील बिघाडाचे प्रमाण दररोज वाढतच आहे. नियोजित वेळेत स्थानकात एसटी बस पोहोचत नसल्याने प्रवाशांना रोजच लेटमार्क लागतो. खड्ड्यांमुळे बसचा वेगही मंदावला आहे.