जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यामध्ये लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली असून ग्रामीण भागातील गावागावांत फिरत असल्याची अफवा पसरविली जात आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र असा कोणताही प्रकार तालुक्यात घडलेला नाही. लोकांनी अशा अफवेवर विश्वास ठेवू नये. तसेच संशय आला असेल, तर जव्हार पोलीस ठाण्यात किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जव्हार पोलिसांनी केले आहे.
मुले चोरी करणाऱ्या टोळीत महिला, दहा ते बारा व्यक्ती असून त्यांच्यापासून सावध राहा, असे मेसेज कुठल्या तरी जुन्या व्यक्तीचे फोटो, समाज माध्यमातून स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जात आहेत; पण जर कुणी मुले चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याबाबत अफवा पसरवली, तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोणतीही खात्री केल्याशिवाय कोणतेही मेसेज प्रसारित करू नयेत. तसेच कोणी अफवा पसरवत असेल, तर पोलिसांना कळवावे, असे सांगण्यात आले.