
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार मान वर काढतात आणि पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा हे आजार कमी होतात. सध्या ‘स्वाईन फ्लू’चा धोका ओसरला असला, तरी मलेरिया आणि डेंग्यूची रुग्णसंख्या कायम आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे १८९ रुग्ण होते. पण आता सप्टेंबरमध्ये २५ तारखेपर्यंत केवळ ७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ ओसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ७८७ रुग्ण होते, तर सप्टेंबरच्या २५ तारखेपर्यंत मलेरियाच्या ५७० रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले असून २५ दिवसांत १८० रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या १६९ रुग्णांची नोंद झाली होती.
सध्या ‘स्वाईन फ्लू’चा धोका ओसरला असला, तरी मलेरिया, डेंग्यूची रुग्णसंख्या कायम आहे. प्रशासनाने मलेरिया, डेंग्यूचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराबाबत लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.