Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

पालिका करणार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंध लसीकरण

पालिका करणार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंध लसीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : जागतिक रेबीज दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत साधारणपणे ५ हजार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध प्राणिप्रेमी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशू वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे.


दरम्यान २८ सप्टेंबर रोजीच्या जागतिक रेबीज दिनानिमित्त अधिक माहिती देताना डॉ. पठाण यांनी सांगितले की, रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे. जो श्वान आणि मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येते. याबाबत उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी साधारणपणे सुमारे दीड कोटी (१५ दशलक्ष) लोकांना जनावरे चावतात. तर दरवर्षी या रोगाने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. याबाबत ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणी श्वानांचा संबंध असतो, त्यातही भटक्या श्वानांची संख्या अधिक असते. या रोगाचा प्रादुर्भाव १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे. देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते.


भटके श्वान व मानवांमध्ये केवळ आंशिक लसीकरण हा रोगाचा प्रमुख जोखीम घटक मानला जातो तसेच तर ज्यांच्या घरी पाळीव श्वान किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. तरी ज्यांच्या घरी पाळीव श्वान, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशू वैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य द्यावी, असेही डॉ. पठाण यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment