उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात आहेत. जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे उल्हासनगर येथे बालकांचे निरीक्षण गृह, अपंग बालकांचे बालगृह, मुलांचे वसतिगृह, महिलांसाठी आधारगृह चालविण्यात येते. या सर्व ठिकाणचे मागील काही महिन्यांचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. या गृहांमध्ये राहणाऱ्या बालकांची आणि महिलांची एकुण संख्या ही सुमारे ३५० ते ४०० इतकी आहे. या गृहांमध्ये सर्व बालक आणि महिला शासनाच्या भोंगळ कारभारामुळे आठ दिवसांपासून अंधारात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने बालगृह तसेच निरीक्षणगृह तसेच वसतिगृह चालविण्यात येतात. यातील काही वसतिगृह ही शासन आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चालविली जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात शासनमान्य २८ बालगृह आहेत. यातील अधिकतर बालगृहे ही सामाजिक संस्थांच्या वतीने चालविली जातात. तसेच यांचा खर्च देखील संबंधित सामाजिक संस्थांच्या वतीने उचलण्यात येतो. यात निराधार, एकल पालक, रस्त्यावरील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांचा सांभाळ कारण्यात येतो. तसेच अत्याचार पीडित, निराधार, गरजू महिलांना शासनाच्या वतीने महिलांच्या शासकीय आधारगृहात आश्रय दिला जातो. उल्हासनगर येथे जिल्हा प्रशासनातर्फे बालकांचे निरीक्षणगृह, अपंग बालकांचे बालगृह, मुला-मुलींचे बालगृह आणि महिलांचे सुधारगृह चालविण्यात येते.