Wednesday, March 26, 2025
Homeकोकणरत्नागिरी‘शिक्षण संस्थांनी उद्योगप्रधान शिक्षण देण्याची गरज’ : उदय सामंत

‘शिक्षण संस्थांनी उद्योगप्रधान शिक्षण देण्याची गरज’ : उदय सामंत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत शिक्षण संस्थांनी पारंपरिक अभ्यासाबरोबरच प्रदेशाच्या गरजा ओळखून उद्योगप्रधान शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने त्यासाठी पुढाकार घेऊन कोकणच्या विकासासाठी विद्यार्थ्यांसाठी उद्योगप्रधान अभ्यासक्रम राबवावे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केले.

र. ए. सोसायटीचे संस्थापक कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. र. ए. सोसायटीतर्फे महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच कै. बाबुराव जोशी यांचा १२५वा जयंती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना ना. उदय सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्य समर्पित वृत्तीचे असून, संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेची कार्यशैली, संघभावनेबद्दल कौतुकास्पद भाष्य केले. भविष्यात संस्थेला जेव्हा काही मदत लागेल तेव्हा आपण त्यासाठी सदैव तत्पर असू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात संस्थेचे सचिव सतीश शेवडे यांनी र. ए. सोसायटीच्या स्थापनेपासूनचा आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा लेखाजोगा मांडला. उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली संपादक मंडळाने संपादित केलेल्या मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा चार भाषेतील महाविद्यालयातील शिक्षक-विद्यार्थांनी रचलेल्या ‘अमृतधारा’ या ७५ कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची उद्घोषणा केली. त्यात कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार – डॉ. मकरंद साखळकर (प्रशासकीय उपप्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), कै. मालतीबाई जोशी आदर्श लिपिक पुरस्कार – प्रियांका धरणे (रा.भा. शिर्के प्रशाला), कै. मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार – सुधीर भोरे (र. ए, संस्था कार्यालय) यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी रा.भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी आयुष काळे याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.

संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात, कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी या ध्येयवेड्या दांपत्याने १९२५ मध्ये महिला महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाच्या क्षेत्रात रोवलेल्या या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेची कीर्ती जगभरात पसरली असून, संस्थेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. भविष्यातही ही संस्था आपली उज्ज्वल परंपरा अशीच पुढे नेत राहील, अशी आशा व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -