विरार (प्रतिनिधी) : कोरोनाच्या झळा मागे ठेवत दोन वर्षानंतर वसईत नवरात्रोत्सवानिमित्त भक्तीचा मळा फुलला आहे. राज्य शासनाने निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी दांडियावर वसईकरांनी फेर धरला आहे. वसई तालुक्यातील श्री जीवदानी, श्री चंडिका व श्री वज्रेश्वरी देवी संस्थान ठिकाणी पहिल्याच दिवशी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून देवीचे दर्शन घेतले, तर रात्री स्थानिक व दुरवरून आलेल्या भाविकांनी दांडियावर फेर धरला. दोन वर्षानंतर सण साजरा होत असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
दरम्यान, तालुक्यात एकूण १३०० दुर्गामातांची प्रतिष्ठापना झाली असून दुर्गामातेच्या २०० प्रतिमांची प्रतिष्ठापना झाली आहे. एकूण ३०० सार्वजनिक, तर १००० वैयक्तिक दुर्गामाता तसेच १०० सार्वजनिक, तर १०० वैयक्तिक प्रतिमांची प्रतिष्ठापना झाली आहे. पुढील महिन्याच्या ५ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव हा सण वसई तालुक्यात जल्लोषात साजरा होणार आहे.
वसईतील विरार येथील जीवधन गडावरील श्री जीवदानी देवी, जुचंद्र येथील श्री चंडिका देवी वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी देवी, खानिवडे (विरार पूर्व) येथील श्री महालक्ष्मी देवी आणि डहाणू येथील श्री महालक्ष्मी मंदिर ही वसई-पालघर तसेच वसई परिसराला लागून असलेली प्रसिद्ध मंदिरं आहेत. दर वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त येथे मंदिर व्यवस्थापन समितीकडून भाविकांची खास व्यवस्था केली जाते. या वर्षीदेखील मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त झाल्याने वसईत दांडिया खेळण्यासाठी व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक बाहेर पडणार आहेत. त्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडू नये म्हणून वाहतूक विभागाचे कर्मचारी बंदोबस्ताला आहेत. तसेच उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ढासळू नये, इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याकरिता पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. दोन वर्षानंतर सण साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह वाढला आहे.
पहिल्या दिवशी प्रसिद्ध देवी मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वातावरण असल्याने या सणात अत्यंत महत्त्व असलेल्या दांडिया (टिपऱ्या) खरेदी करण्यावर भाविकांनी विशेषत: महिला भाविकांनी भर दिला आहे. वसईत गुजराती समाज मोठा असल्याने वसईत दांडिया खेळाला बहर येणार आहे.