Monday, April 28, 2025
Homeमहत्वाची बातमीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार कायापालट; केंद्र सरकारची मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार कायापालट; केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, अहमदाबाद स्थानकांचा होणार पुनर्विकास

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ३ प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नवी दिल्ली रेल्वे स्थानक, अहमदाबाद रेल्वे स्थानक; आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) मुंबई या स्थानकांचा त्यात समावेश असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्ली येथे दिली.

कोणत्याही शहरासाठी रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे आणि केंद्रीय स्थान असते. रेल्वेच्या कायापालटामध्ये रेल्वे स्थानकांच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. १९९ रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी ४७ रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. ३२ स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. बुधवारी नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

स्थानकांचा पुनर्विकास झाल्यावर असणार ‘हे’ चित्र प्रत्येक स्थानकात किरकोळ दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी असलेले भरपूर जागा असलेले, एक रुफ प्लाझा असेल. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्थानकाची इमारत असल्याने शहराच्या दोन्ही बाजू या स्थानकांनी जोडलेल्या असतील. फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असेल.

रेल्वे स्थानकांना आरामदायी करण्यासाठी योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था, रस्ता शोधण्याचे नकाशे/खुणा, ध्वनिव्यवस्था, लिफ्ट/सरकते जिने/ट्रॅव्हलेटर्स असतील. वाहतूक सुलभ होण्यासाठी पुरेशा पार्किंग व्यवस्थेसह बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे. मेट्रो, बस इत्यादींसारख्या इतर परिवहन सुविधांसोबत एकात्मिकरण करण्यात येईल. सौर उर्जा, जल संवर्धन/पुनर्चक्रीकरण आणि सुधारित वृक्ष आच्छादनासह हरित इमारत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. दिव्यांग स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल.

इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील. आगमन आणि प्रस्थान यांची स्वतंत्र विभागणी करणारी व्यवस्था असेल. गोंधळरहित फलाट, सुधारित पृष्ठभाग, संपूर्णपणे आच्छादित फलाट असतील. सीसीटीव्ही आणि हाताळणीचे नियंत्रण यासाठी रेल्वे स्थानके सुरक्षित असतील. या रेल्वे स्थानकांच्या इमारती मानबिंदू असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -