
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेचा संशोधन अभ्यासातून जागर घालणारा निस्सीम पाईक गमावला, अशी प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रांसह अनेक मान्यवरांनी व्यक्त केली, वारकरी संप्रदायाचा वारसा जपतानाच डॉ. देखणे यांनी संत साहित्य लोकसाहित्याचा आत्मीयतेने अभ्यास केला. भारूड या लोकसाहित्याचा ध्यास घेतला. नव्या पिढीसाठी त्यांनी संशोधनात्मक ध्यास घेतला. त्यामुळे डॉ. रामचंद्र देखणे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे हे क्रमप्राप्त आहे.
प्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार आणि बहुरूपी भारुडकार म्हणून महाराष्ट्राला ते परिचित होते. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात प्रथम श्रेणीचे अधिकारी म्हणून ३४ वर्षे नोकरीतून सेवा केली. निवृत्तीनंतर डॉ. देखणे यांनी संत साहित्य अभ्यासात झोकून देऊन काम केले. ‘ऐसा वासुदेव बोलतो बोल, विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव’, अशा संत एकनाथांच्या भारुडांच्या सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनाचे काम डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
संत साहित्यासह लोकवाङ्मय व भारुडांचाही त्यांचा अभ्यास होता. त्यांनी ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक ४७ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध संत साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवली. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काही काळ काम केले होते. मागील ३५ वर्षांहून अधिक काळ संतविचार प्रबोधिनी दिंडीच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसाराचे काम त्यांनी केले. राज्य सरकारसह विविध संस्थांनी त्यांना शंभरवर पुरस्कार दिले आहेत. सध्या भारतीय संगीत प्रसारक मंडळ, गांधर्व महाविद्यालय, पुणे या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळत होते. आजपर्यंत त्यांच्या कथा, कादंबरी, बालसाहित्य, संतसाहित्य, चिंतनात्मक, संशोधनात्मक आणि वैचारिक स्वरूपाचे विविध ५० हून अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाल्या आहेत.
यातील प्रसिद्ध कथासंग्रह गोरज, येरवाळींचं येणं, साठवणीच्या गोष्टी असून भूमीपुत्र, गोपानिनाद या कादंबऱ्या आहेत. संत साहित्यात अमूल्य भर टाकणारी आषाढी, दिंडी, ज्ञानदीप लावू जगी, शारदीचिये चंद्रकळे, पालखी, एकची टाळी झाली, आनंदाचे डोही, वारी स्वरूप आणि परंपरा, तुका झालासे कळस, संत साहित्यातील पर्यावरण विचार, तुका म्हणे जागा हिता ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. संत साहित्याबरोबर लोकसाहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी लिखाण केले. बहुरूपी महाराष्ट्र, बहुरंगी भारुड, भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान, लागे शाहिरी गर्जाया, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, महाराष्ट्राचा लोकदेव-खंडोबा, गोंधळ परंपरा स्वरूप आणि आविष्कार, भारुड आणि लोकशिक्षण यावरील लोकसाहित्य त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहे. महाकवी, सुधारकांचा महाराष्ट्र, आनंद तरंग, कर्मयोगाचे नीतिशास्त्र, लोकशिक्षक गाडगेबाबा, जीवनयोगी साने गुरुजी यांवर त्यांनी वैचारिक आणि चरित्रात्मक साहित्य लिखाण केले. अनेक वृत्तपत्रांतील सगुण-निर्गुण, पालखी, आनंदाचे डोही, माहेर पंढरी, मनाचिये गुंथी, शिवार आणि शिदोरी या आध्यात्मिक वाचकप्रिय सदरातून त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत अध्यात्म आणि जीवनाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. अंगणातील विद्यापीठ, खरा श्रीमंत, करावे तसे भरावे, जीवनाचे चित्र ही पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्य प्रकारात लिखाण केले. श्री ज्ञानेश्वरी चिंतन आणि चर्चा, पर्यावरण बोध आणि नरसिंह हे संपादित साहित्य प्रसिद्ध आहे. विविध वृत्तपत्रे आणि दिवाळी अंकांमधून तीन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. बहुरूपी भारुडाचे देश आणि राज्यभरात २१०० हून अधिक प्रयोग त्यांनी केले. देश, विदेश आणि राज्यभरात तीन हजारांहून अधिक व्याख्याने केली. लेखन, संशोधन, प्रबोधन आणि कला आविष्कारासाठी १०० हून अधिक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
'साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १९वे साहित्यिक कलावंत संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यापूर्वी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. आनंद यादव, प्रा. रा. ग. जाधव, उत्तम कांबळे, नारायण सुर्वे, डॉ. यशवंत मनोहर, फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. देखणे यांनी संशोधनात्मक आणि चिंतनात्मक अशा ४७ पुस्तकांचे लेखन केले आहे. संत एकनाथांच्या भारुडांवर आधारित 'बहुरूपी भारुड' या कार्यक्रमाचे एकवीसशेहून अधिक प्रयोग केले आहेत. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या एकसष्टीनिमित्त विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे एकसष्टी गौरव समितीतर्फे आयोजित देखणा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात झाला होता.