धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण कधी येतील हे सांगता येत नाही; परंतु निखळ हास्य मनोरंजनाने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याची ताकद ज्या कलाकारांमध्ये आहे, अशी मोजकी कॉमेडियन मंडळी देशात नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहेत. त्यातील एक नाव म्हणजे राजू श्रीवास्तव. जीवनात खळखळून हसायला लावणाऱ्या राजूने जगाच्या रंगमंचावरून बुधवारी एक्झिट घेतली आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली. १० ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयामध्ये अनेक ब्लॉकेजेसचा अहवाल समोर आल्यानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने राजूची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर गतकाळापासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या ५९ वर्षीय राजू श्रीवास्तवची प्राणज्योत काल मालवली.
राजू श्रीवास्तव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्टेज शोपासून केली. त्यावेळी त्यांना ५० रुपये मानधन मिळत होते. स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याचा नावलौकिक झाल्यानंतर एका शोसाठी पाच ते दहा लाख रुपये मानधन मिळू लागले होते. छोट्या गावातून आलेल्या या कलाकाराची १५ ते २० कोटींची संपत्ती झाली असली तरी त्यामागे प्रचंड परिश्रम दडलेले आहेत. विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविणारा राजू जिंदालदिल व्यक्तिमत्त्व होते. त्याचा स्वभाव भावनिक असल्याचे त्याच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात आले. मुळात राजू हा अमिताभ बच्चन यांचा मोठा फॅन होता. त्याच्या करिअरची सुरुवात त्याने अमिताभची मिमिक्री करून केली. कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात राजूसुद्धा एकदा सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांनी अमिताभचा हुबेहूब आवाज काढल्यानंतर हा नेमका आवाज कुणाचा? असा प्रश्न प्रेक्षकांना निर्माण झाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही त्याने मिमिक्री केली होती. राजूचे वडील हास्यकवी होते. त्यामुळे रक्तामध्ये विनोदबुद्धी ठासून भरलेली होती.
गजोधर भैया या नावाने कार्यक्षेत्रात त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द ग्रेट इंडियन लॉफ्टर चैलेंज’ या कॉमेडी शोमधील गजोधर भैयाची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरली होती. शाळेत असताना ते वडिलांच्या कवितांच्या ओळींचे वाचन करताना इतरांची नक्कल करत होते. उत्तर प्रदेशातील कानपूरसारख्या छोट्या शहरातून आलेल्या राजूचे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव आहे, हे अनेकांना माहीत नव्हते. लोक राजू किंवा गजोधर भैया या नावाने त्याला ओळखत होते. शाळा आणि पार्टीमध्ये तो लोकांचे मनोरंजन करायचा म्हणून त्याची आई त्याच्यावर त्या काळी रागवत होती. शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी आईची इच्छा होती; परंतु अत्यंत कष्ट करून राजू यांनी कॉमेडी विश्वात स्वत:चा ठसा उमटविला.
आता स्टँडअप कॉमेडियन ही संकल्पना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे. ही संकल्पना येण्याच्या आधीपासून तो काम करत होता. मॅकनोज गोल्ड या चित्रपटाच्या ट्रेलरवर गावातील, खेड्यातील मुलगा कसा प्रयोग करून दाखवत होता. हे त्या काळात मोठे काम होते. आता स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या कलाकारांबाबत अनेक विशेषणे लावली जातात. दुसऱ्याच्या भावनांची कदर न करता विनोद करणे असे प्रकार सध्या घडत आहेत. विनोदाचे विकृतीकरण, विनोदाच्या नावाखाली नंगानाच काही मंडळीकडून केला जातो. तसेच विनोद करण्याऐवजी क्रूर चेष्टा करण्याची नवी पद्धत परदेशातून काहींनी आत्मसात केल्याची उदाहरणे समोर आहेत. आता त्यांची नावे घेऊन टीका करणे हा वेगळा विषय होऊ शकतो; परंतु राजू याने तसा कोणताही प्रकार केला नाही. साध्या आणि सोप्या भाषेत तो विनोद करत होता. दुसऱ्याचा उपमर्द न करता लोकांना हसवता येते, अतिपांचटपणा न करता, तसेच कोणत्याही व्यक्तीचे चरित्रहनन न करता विनोदाची कला कशी साधायची याचे टायमिंग त्याने जुळवून आणले होते. जहरी टीका न करता एखाद्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करता येते, हे राजूने दाखवून दिले होते.
महाराष्ट्रातील कलाकार मंडळींमध्ये अनेक हास्य कलाकार आहेत. पु. ल. देशपांडे यांची कार्यक्रमातील विनोद करण्याची परंपरा आज कायम आहे. राजूने मुंबई कर्मभूमी मानून अनेक शो केले. त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा त्याने आदर केलेला दिसून आला. तसेच सुसह्य विनोद करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. राजू हा खेडेगावातून आला. मातीतला माणूस म्हणून त्याचे पायही नेहमी जमिनीवर राहिले. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य निर्माण करणाऱ्या राजूच्या जाण्याने अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत आज अश्रू तरळले असतील. हीच राजूच्या कामाची पोहोचपावती म्हणता येईल.