Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकुटुंबाचा विनाश का होतो?

कुटुंबाचा विनाश का होतो?

मीनाक्षी जगदाळे

आपल्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेनुसार आपण कायम एकत्र, एकीने आणि एकजुटीने राहणे, कुटुंबात राहणे, एकमेकांना धरून राहणे, सुखदुःखात सहभागी होणे, सर्व नात्यांना ऐका छताखाली सुखासमाधानाने नांदताना पाहणे यालाच प्राधान्य दिले आहे. कुटुंबातील कितीही सदस्य वेगवेगळ्या विचारांचे असले तरीही ते वर्षानुवर्षे एकाच घरात अतिशय आनंदाने राहतात, याला मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील प्रेम, विश्वास, आदर आणि सोबतच सुसंवाद. एकाच घरात वेगवेगळ्या वयोगटातील, विविध शैक्षणिक पात्रता असलेले, वेगवेगळ्या वैचारिकतेचे, स्वभावाचे, विविध अनुभव घेतलेले लोक सातत्याने हसत-खेळत राहून कुटुंबाची तसेच वैयक्तिक प्रगती सुद्धा करताना दिसतात. घरातील प्रत्येक सदस्याचा कौटुंबिक पाया जर भक्कम असेल तर त्या व्यक्तीला, घराला समाजात नावलौकिक मिळण्यापासून, यशस्वी होण्यापासून, पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

आजही समाजात अनेक अशी मोठी कुटुंब आहेत जे गुण्यागोविंदाने सोबत राहत आहेत. काही ठिकाणी नौकरी व्यवसायानिमित्त वेगळ्या ठिकाणी स्थायिक व्हावे लागले तरी एकमेकांना आडी-अडचणीत मदतीला धावून येणे त्यांनी सोडलेले नाही. घरातील सर्व सण वार, पूजा पाठ, व्रत वैकल्य, वाढदिवस, लग्न, एकत्रित प्रवास, सहलींना जाणे यांसारख्या प्रसंगांना सर्वांनी मिळून न्याय देणे, वेळ देणे आजही अनेक कुटुंबात आवर्जून पाहायला मिळते. घरातील प्रत्येक जण दुसऱ्याच्या भावना समजावून घेतोय, त्याला सांभाळून घेतोय, घरातील सर्व निर्णय एकत्र येऊन एक विचाराने घेतले जात आहेत. सगळ्यांना सामान वागणूक मिळते आहे. कोणताही दु:स्वास, हेवादावा, भेदभाव, मत्सर, आरोप- प्रत्यारोप, तुलना न करता आहे त्या परिस्थितीमध्ये समर्थपणे एकमेकांच्या सोबत उभे राहून जिद्धीने, धडाडीने जगणारे कुटुंब म्हणजे आपल्या लेखी आदर्श कुटुंब होय.

प्रत्येकाच्या भावनांची कदर करणे, कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेणे, अवघड आणि कसोटीच्या प्रसंगी शांतता, संयम आणि विश्वास या त्रिसूत्रीनुसार वर्तन करणे, घरातील कोणालाही न दुखावणे, कळत-नकळत तसे झालेच तर ताबडतोब माफी मागण्यात, माघार घेण्यात कमीपणा न मानणे, घरातील कोणत्याही चुकीच्या गोष्टी, चुकीचे निर्णय याचे समर्थन न करता त्यावर उपाययोजना करणे, कोणाच्याही चुकांवर पांघरून न घालता त्याला ताबडतोब त्यातील तोटे, नुकसान लक्षात आणून देऊन कोणतीही अप्रिय घटना घरात घडण्यापासून त्वरित थांबावणे, घरात सतत कोणाला न कोणाला लक्ष बनवून त्याला मानसिक त्रास न देणे या साध्या सोप्या सवयी अंगीकारल्या तरी आपलं कुटुंब हसत-खेळत एकत्र जगू शकतं यात शंकाच नाही.

या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बाजावतो तो म्हणजे घरातील व्यक्तींमधील स्पष्ट आणि समोरासमोर साधलेला सुसंवाद. सुसंवादामुळे गैरसमज टाळणे सोपे होते, सगळ्यांचं त्यांची ऐकून घेण्याची, समजून घेण्याची मानसिकता, सगळ्यांनी एकाच सकारात्मक उद्देशाने एकाच दिशेला प्रवास करणे, सगळ्यांचं अंतिम ध्येय आणि स्वप्न आपलं कुटुंब टिकवणे हेच असणे, कुटुंबाच्या कल्याणाचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असणे त्यासाठी चर्चा, विचारविनिमय आणि माहितीचे आदान-प्रदान करणे.

आपण ज्या ज्या वेळी दुभंगलेली, विस्कळीत झालेली आणि विखुरलेली कुटुंब व्यवस्था पाहतो त्या त्या वेळी त्यामागील कारणे शोधणे देखील क्रमप्राप्त आहे. कुटुंब तुटायला, कुटुंबातील सदस्यांची ताटातूट व्हायला, त्यांची मनं दुभंगायला, कुटुंबाची सामाजिक मानहानी व्हायला, आर्थिक नुकसान व्हायला, मुलांवर चुकीचे संस्कार होऊन मुलं चुकीच्या मार्गावर जायला आणि स्त्रियांवर अन्याय-अत्याचार व्हायला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा वर नमूद केलेल्या मुद्द्यावर कुटुंब सदस्य कधीच गांभीर्याने विचार करत नाहीत, स्वतःच्या चुकीच्या वागणुकीत वेळीच सुधारणा करत नाहीत.

कोणतेही घर अथवा कुटुंब अचानक विस्कळीत होत नसते, तर त्याची कारणे अनेक वर्षांपासून होत असलेल्या असंख्य चुका, परत परत जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या चुका, चुकीचे निर्णय, मनमानीपणा, अंदाधुंद भरकटलेलं, फसलेले आर्थिक अंदाज, तोट्याचे व्यवहार, बेताल, बेफाम आणि समाजाची चकोरी सोडून केलेली वागणूक, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, मालमत्तेवरून होणारे वाद, एकमेकांना विश्वासात न घेता केलेल्या कृती, घरातील कोणाचेही गंभीर दीर्घ मुदतीचे आजारपण, कोणाचा घात-पात, अपघात, आत्महत्या, घरातील कोणी सदस्य कायमस्वरूपी घर सोडून जाणे, घरातील महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू, घरातील कोणीही घरा बाहेरील चुकीच्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करणे, वाईट वळणाच्या मित्र, मैत्रिणी, संगत यांना घरात प्रचंड हस्तक्षेप करू देणे, चुकीच्या व्यक्तींवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास टाकणे, घरातील सूत्र परक्या व्यक्तीच्या हातात देणे, घरातील लोकांची बदनामी समाजात करणे, घरातील लहान मुले, युवा पिढी यांच्यावर लहानपणापासून नीट संस्कार न करणे, घरावर मोठ्या प्रमाणात कर्ज असणे, विनाकारण नात्यातील, गणगोतातील, समाजातील कोणाशीही शतृत्व, दुश्मनी घेतलेली असणे यांसारखी असंख्य कारणे जबाबदार असतात.

ज्या कुटुंबात नितीमूल्य, नैतिकता, तत्त्व यांना फाट्यावर मारले जाते, समाजाच्या विरुद्ध जाऊन अथवा बेजबाबदारपणाची वर्तवणूक आढळते ते कुटुंब डबघाईला आल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष सर्वांना सांभाळून वाटचाल करतो आणि घरातील स्त्रीला, तिच्या सल्ल्याना विचारात घेऊन कृती करतो, तिचा मान ठेवतो, घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करतोय आणि लहान मुलांवर नि:स्वार्थी प्रेम करतोय त्या कुटुंबाला मान खाली घालण्याची वेळ येत नाही. खोटा अहंकार, खोटा मोठेपणा, दिखावा, कृत्रिम नातेसंबंध, नाटकी वागणूक, फुशारक्या मारणे, दिलेल्या शब्दाला न जागणे, सतत आपली मतं, विचार आणि निर्णय बदलत राहणे, कधीही ठाम भूमिका घेता न येणे, बोलायचं एक, करायचं भलतंच अशी वृत्ती, हेकेखोरपणा, मनमानी कारभार, इतरांना तुच्छ समजण्याची मानसिकता मोठमोठ्या घराण्यांना, राजा राजवड्यांना रसातळाला घेऊन गेलेली आहे. अशा प्रवृत्तीमुळे राजघराणे, संस्थानदेखील बुडाल्याची उदाहरणे आहेत, तर आपण खूपच क्षुल्लक आहोत.

कुटुंबातील काही लोकांना जर स्वतःची मतं, स्वतःच्या अपेक्षा, आपलेच वैयक्तिक विचार, आपल्या सवयी दुसऱ्यावर जबरदस्तीने लादण्याची घाणेरडी सवय असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यांची घुसमट होते. त्यामुळे कुटुंब व्यवस्था तुटू लागते आणि विभक्त जीवनशैलीचा उदय होतो. कुटुंबातील प्रत्येकाला मानसिक स्वातंत्र्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपलं कुटुंब या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या कुठे आहे आणि आपल्याला कुटुंब सावरण्यासाठी कुठे किती आणि कसं बदलण्याची आवश्यकता आहे. याचे आत्मपरीक्षण सर्वांनी करणे अपेक्षित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -