राज्यातील १६ जिल्ह्यांतील ६०८ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्याचे निकाल जाहीर झाले. या निकालातून पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट झाली की, भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष आहे. राज्यात अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यांपूर्वी कोसळले आणि सध्या भाजपच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करणारे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या दोन महिन्यांत गद्दार, खोके हे शब्द सर्वसामान्य जनतेच्या कानावर सतत ऐकू येत होते. महाराष्ट्रात गद्दारीला स्थान नाही. भाजपने शिंदे यांचा गट फोडल्यामुळे भाजपला फटका बसेल असे अंदाज व्यक्त केले जात होते. काही खासगी वाहिन्यांकडून महाराष्ट्रात आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर भाजपला तोटा होईल असा अंदाज व्यक्त केला. महाराष्ट्रातील वातावरण असे निर्माण झाले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या गटाला सहानुभूती मिळत आहे; परंतु राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालातून दिसून आले की, ठाकरे यांना कोणतीही सहानुभूतीची लाट नाही.
मुळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या निवडणुकीत उतरतात, ते ज्या विजयी होतात त्यावेळी आनंदोत्सव, जल्लोष साजरा करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांचे झेंडे बाहेर आल्याचे दिसले. शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसला असला तरी, ठाकरे गट या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाचव्या स्थानावर गेल्यामुळे, ती शिल्लक सेना राहिली आहे, हे आता मतपेटीतून समोर आले आहे. या निकालानंतर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या असे दावे केले गेले. या सर्व रणधुमाळीमुळे ठाकरे गटाचा कुठेही आवाज आपल्याला ऐकायला आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील भाजपची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न राज्यातील काही मंडळींनी वेदान्ता प्रकल्पामुळे केला. महाराष्ट्रात दोन लाख रोजगार निर्मिती करणारा पुणे-तळेगाव येथील वेदान्ता प्रकल्प गुजरातमध्ये पळून नेला असा आरोप विरोधकांकडून केला. राज्यातील तरुणांच्या नोकऱ्यांची संधी शिंदे-फडणवीस सरकारने गमावली, दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राने नांगी टाकली, असा प्रचार केला गेला. मराठी आणि महाराष्ट्र अस्मितेला जागवण्याचा प्रयत्न झाला. या प्रकल्पामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी गणिते राजकीय धुरिणींकडून मांडली गेली. मात्र वस्तुस्थिती फार वेगळी असू शकते, याचे प्रत्युत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर पुन्हा आले. राज्यातील गावागावांमध्ये भाजपचे कमळ फुललेले दिसले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर राज्यातील १२ कोटी जनतेची त्यांना सहानुभूती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ते चित्र आभासी होते हे सिद्ध झाले.
राज्य निवडणूक आगोगाकडून ग्रामपंचायतींच्या विजयाचे आलेले निकाल आणि राजकीय पक्षांकडून निकालाच्या आकड्याबाबत केलेले दावे हे सध्या ढोबळ आकडे आहेत, असे मानले तरी, एकूण संख्याबळ पाहता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. राज्यातील एकूण ६०८ पैकी ६१ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. २५९ हून अधिक ठिकाणी भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिंदे गटाने काही ठिकाणी लक्षवेधी विजय मिळवला आहे. निकालामध्ये शिंदे गट चौथ्या क्रमांकावर आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही निकाल लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. साताऱ्यातील ६ ग्रामपंचायतींपैकी खेड ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार आमदार महेश शिंदे यांनी झेंडा फडकावला. त्यामुळे सातारा ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा शिरकाव झाला आहे. पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक ३० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपला केवळ तीन जागा जिंकता आल्या आहेत. थेट सरपंचपदामध्येही राष्ट्रवादीने सर्वाधिक ३० ठिकाणी विजय मिळवला आहे. या निवडणुकीचा धडा घेत भाजपला आता पुण्यात अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
एकूण ८८ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. शिवसेनेने १३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपने पाच, तर काँग्रेसने चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजप व काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे निकाल लागले त्यात सर्वाधिक ३३ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने विजय मिळवला. भाजपने २० ठिकाणी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसने ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. शिवसेनेला तीन, मनसेला एका जागेवर विजय मिळवला. कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली. त्यामुळे, शिंदे सरकारने विश्वासघाताने सरकार स्थापन केले, हा ठाकरे गटाचा दावा या निकालातून स्पष्ट झाला आहे. कोरोना काळात महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे माजी मुख्यमंत्री ठाकरे हे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत होते, हा प्रचार जनतेच्या मनापर्यंत उतरला नाही, हेही या निकालातून सांगता येईल.