लंडन (वृत्तसंस्था) : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) आगामी दोन्ही हंगामातील अंतिम फेरीचे सामने इंग्लंडमध्येच रंगणार आहेत. आयसीसीने नुकतेच हे जाहीर केले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा पहिला हंगाम इंग्लंडच्याच साऊदम्पटन मैदानात पार पडला होता. त्यानंतर आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना ‘द ओव्हल’ येथे खेळवला जाईल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५चा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३चा अंतिम सामना जूनमध्ये होणार आहे.
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ७० टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर टीम इंडियाचा विचार केला असता भारतीय संघ ५२.०८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान ५१.८५ टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा संघ ५० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे २५.९३ टक्के आणि बांगलादेशचे १३.३३ टक्के गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकूनही इंग्लंड ३८.६ टक्के गुणांसह सातव्या स्थानावर आहे.