मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या आगामी ३वर्षांच्या सर्व गटाच्या निवड चाचणी स्पर्धा, मान्यताप्राप्त राज्यस्तरीय स्पर्धा व सर्व उपक्रम आता “स्पोर्टवोट अॅप डिजिटल” प्लॅटफॉर्मवर पहावयास मिळतील.
राज्य कबड्डी असो.चे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, सरचिटणीस आस्वाद पाटील, तर स्पोर्टवोटच्या वतीने सिद्धांत अगरवाल यांच्यात याबाबतची यशस्वी बोलणी करून ३ वर्षांचा करार करण्यात आला आहे. स्पोर्टवोट हे केवळ एक प्रसारक माध्यम नसून संपूर्ण खेळ प्रक्रिया डिजिटल स्वरूपात खेळाडू आणि चाहत्यांसाठी मनोरंजन करणारे हे एक सर्वसमावेशक माध्यम ठरणार आहे.
आम्हाला महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सोबत काम करावयास मिळते, याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे स्पोर्टवोटचे सर्वोसर्वा सिद्धांत अगरवाल म्हणाले. कबड्डी हा आपल्या लाल मातीतील खेळ असून आज तो मॅट वर खेळला जातो. त्या कबड्डीतील खेळाडूला त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रोत्साहन, प्रसंशा आणि उद्धार करण्याची अचूक संधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.मुळे मिळतच असते. आता त्याला “स्पोर्टवोटच्या” तांत्रिकतेची जोड मिळणार आहे, असे अगरवाल म्हणाले.