नाशिक (प्रतिनिधी) : झटपट श्रीमंत होण्यासाठी म्हणून बिबट्याची कातडी मिळवून जास्त पैसे मिळवण्याचा हेतू ‘त्या’ महाविद्यालयीन तरुणांचा होता, हे वनविभागाने केलेल्या प्रथमदर्शनी तपासामध्ये समोर येत आहे. पण यातून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे, ते म्हणजे आजकालच्या तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचा मोह काही सुटताना दिसत नाही.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास नाशिक शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ तीन महाविद्यालयीन तरुणांना बिबट्याची कातडी व इतर साहित्यासह अटक केली होती. त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे, पण हे तीनही महाविद्यालयीन युवक असून त्यांनी या बिबट्याच्या कातडीचा व्यवहार हा प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचेदेखील समोर आले आहे. काहींना चार लाख तर काहींना सतरा लाखापर्यंतची ऑफर दिली होती. हा व्यवहार त्यांच्या मनाप्रमाणे होत नव्हता. त्याचदरम्यान वनविभागाला याची माहिती लागली आणि हे युवक वनविभागाच्या जाळ्यात सापडले. परंतु हे सर्व घडल्यानंतर जो तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला, तो जर बघितला तर या युवकांची इच्छा जी होती ती फक्त झटपट श्रीमंत होण्याची. जेणेकरून झटपट पैसे मिळावे आणि आपण श्रीमंत होऊ, ही एकमेव भावना त्यामागे होती. या युवकांचा प्रवास बघितला तर हा सर्वसामान्य घरातील ते असल्याचा असा आहे. परंतु वन तस्करांनी जे जाळे टाकले होते, त्या माध्यमातून हे युवक त्यात अडकले. झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गातून हा प्रकार घडल्याचेदेखील समोर आले आहे.
या सर्व प्रकरणाचा तपास वनविभागाकडून अधिक होण्याची गरज आहे. या युवकांकडून जी माहिती मिळत आहे, ती अतिशय धक्कादायकच आहे. या माहितीतून युवकांचा उद्देश समोर आला. यामध्ये दुसरी धक्कादायक बाब समोर आली ती अशी की, आज महाविद्यालयीन युवकांना झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारीकडे त्यांची पावले पडत असून ही बाब प्रशासनालादेखील थक्क करणारी आहे. यासाठी महाविद्यालयीन युवक हा कोणत्या स्तरावर जात आहे, हेही स्पष्ट होते. प्रशासनाला आता अधिक सतर्कतेने काम करण्याची आवश्यकता देखील निर्माण झाली आहे.
या तीन युवकांकडून बुधवारी बिबट्याची कातडी तसेच निलगाय आणि चिकांरा या प्राण्यांची प्रत्येकी २ शिंगे जप्त करण्यात आली. सदर आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. गादिया हजर करण्यात आले होते. या तीन युवकांना चार दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील सुधीर आर. सपकाळे यांनी वनविभागाची सरकारतर्फे बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने बाजू ऐकून घेतली.
या प्रकरणात टाकण्यात आलेल्या सापळ्यामध्ये उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक सचिन आहेर, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम पाटील, गोविंद काळे, राजेंद्र ठाकरे, गणेश सत्रे, प्रकाश साळुंखे तसेच वनसेवक पांडुरंग भोये यांनी ही कारवाई केली. अंबादास जगताप, इको-इको या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य वैभव भोगले व अभिजित महाले आणि अशोक खानझोडे आणि सुनिल खानझोडे आदी अधिक तपास करीत आहे.