Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीमिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे कार्यकर्ते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे कार्यकर्ते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

नवी दिल्ली (प्रतिनिधी): महाराष्ट्रात परिवर्तन करून आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे नेत आहोत. आम्ही महाराष्ट्रात केलेल्या परिवर्तनाचे जगाने दखल घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमच्यातील कोणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनण्यासाठी उठाव केला नाही. आम्ही मिंधे नाहीत तर बाळासाहेब ठाकरेंची खंदे कार्यकर्ते असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे.

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील सभेत शिवसेना खासदार, आमदार व विविध राज्यातील शिवसेनेचे राज्यप्रमुख यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत शिंदे गटावर मिंधे असल्याची टीका केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांत गटप्रमुखांची आठवण आली नाही. शिवसैनिकांनी मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही उठाव केल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसैनिक आणि गटप्रमुखांची आठवण आली आहे. ‘आम्ही सत्तेत होतो, सत्ता कोणी सोडत नसतो. विरोधी पक्षातून सत्तेत जातात, पण आम्ही सत्तेला सोडून गेलो. हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. अडीच वर्षांपूर्वी आम्ही भाजपसोबत लढलो. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचा फोटो होता. हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी आम्ही एकत्र होतो. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येणार, असा अनेकांनी विचार केला होता. पण, ज्यांच्याविरोधात(काँग्रेस-राष्ट्रवादी) आम्ही वर्षानुवर्षे लढलो, त्यांच्यासोबत यांनी सरकार स्थापन केले,’ अशी टीका त्यांनी यावेळी केली.

‘बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहेत, त्यांना जवळ करू नका. त्यांना जवळ करण्याची वेळ आल्यावर मी माझा पक्ष बंद करेल. पण, काय झाले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपला दूर करुन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळेस अनेकांनी विरोध केला, पण प्रमुखांच्या आदेशापुढे आम्ही गेलो नाही. अडीच वर्षात कुणीही खुश नव्हते. आमची सत्ता असूनही, आमचे लोक तुरुंगात जात होते. शिवसैनिकांवर अन्याय सुरू होता. हे काम सरकारमधील लोक करत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे आमदार व एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेले शिवसेनेतील विविध राज्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेबांनी मोहासाठी राजकारण केले नाही

२०१९ च्या विधानसभा निवडणूका सेना-भाजप युती करून लढली. हिंदूत्वाची भूमिका मांडली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही अनेक वर्षे लढलो. मात्र, बाळासाहेब ठाकरे ज्यांना शत्रू समजत होते. त्यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात आमचा नेता असूनही आमच्यावर अन्याय झाला. अन्यायाच्या विरोधात उठाव करून आम्ही सरकार स्थापन केले आहे. मी जिथे जिथे जातो तेथे हजारो लोक पाठींबा देण्यासाठी येत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी कशाच्याही मोहासाठी राजकारण केले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून ठाकरेंवर पलटवार केला. ‘आम्ही बाळासाहेबांची आणि आनंद दिघेंची विचारधारा मानणारे लोक आहोत. तीन महिन्यांपूर्वी अनेकांनी आम्हाला सांगितले की, महाराष्ट्रात बदलाची गरज आहे. त्यामुळेच राज्यात परिवर्तन झाले. याची दखल फक्त राज्याने नाही, तर संपूर्ण देशाने घेतली. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्यासाठी माझ्यासोबत आमदार आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. शिवसेनेला वाढवण्यासाठी आम्ही दिवसरात्र राबलो, तुम्हाला शिवसेना फक्त आमचीच आहे, असे म्हणण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेना लगावला आहे.

अन्याय मर्यांदेपेक्षा जास्त झाल्याने उठाव

‘आमचे आमदार नेहमी माझ्याकडे यायचे, मी त्यांचे ऐकायचो. जेवढी होईल, तेवढी मदत मी करायचो. ज्यांनी मदत करायला हवी, त्यांनी केली नाही. मुख्यमंत्रिपदावर आमचा नेता असूनही आमच्यावर अन्याय व्हायचा. अन्याय मर्यादेपेक्षा जास्त झाल्यामुळेच हा उठाव केला. आम्ही चुकीचे काम केले असते, तर मी जातो तिथे हजारो-लाखो लोकांची गर्दी जमली नसती. आम्ही घेतलेली भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची भूमिका आहे. सरकार किंवा सत्तेसाठी त्यांनी कधीची आपली विचारधारा सोडली नाही. सत्तेसाठी त्यांनी कधीही आपली भूमिका बदलली नाही. आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळेच आमच्या भूमिकेचे स्वागत अनेकांनी केले,’ असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -