Friday, October 31, 2025
Happy Diwali

मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही

मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

अमरावती : शिवसेना शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजर आहे. पिंजऱ्यातल्या मांजरांनी कितीही म्याव म्याव केले तरी तो वाघाची डरकाळी फोडू शकत नाही, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची खिल्ली उडवली. ते आज अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्यावर टीका केली जात असताना त्याला मनसेने सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मनसेला भाजपची शाखा म्हटले होते. त्यावर देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आउटडेटेड नेते आहेत. त्यांना शिवसेनेत कोणीही विचारत नव्हते. त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. शिल्लक राहिलेल्या सेनेला त्यांनी वाचवावे, असा उपरोधिक सल्ला देशपांडे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांचा धसका शिवसेनेने घेतला असून, ज्या पद्धतीचा प्रतिसाद विदर्भात मनसेला मिळत आहे. तो प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पुढे अंबादास दानवे यांचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत काहीच बोलू नये. चार दिवसाआधी यांना शिवसेनेत कुणीही विचारत नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणावर बोलावे, शिवसेनेचे नेतृत्व हे आउटडेटेड असून, औरंगाबाद येथील नेते देखील आउटडेटेड आहे. ते दानवे असो की, खैरे सगळे आउटडेटेड आहेत, असे देशपांडे म्हणाले.

पुढे दसरा मेळाव्याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा किंवा न घ्यावा त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. कितीही शिवतीर्थावर दसरा मेळावा केला तरीही बाळासाहेबांचे विचार तुमच्यात आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. जर विचारच तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मेळावे घेऊन जनतेला काय देणार आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे विचार देणार आहात का? तुम्ही फक्त राष्ट्रवादी, शरद पवारांचे विचार देणार आहात, अशीही टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >