मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्या ६० उमेदवारांविरोधात अखेर म्हाडाने मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या उमेदवारांविरोधात पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र हे प्रकरण पुण्यातील नसल्याने पुणे सायबर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर म्हाडाने खेरवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.
म्हाडाच्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणारी परीक्षा गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर टीसीएसच्या माध्यमातून म्हाडाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये परीक्षा घेतली. मात्र या परीक्षेच्या निकालाच्या निवड यादीत ६३ सशंयीत उमेदवार आढळल्याने म्हाडाने टीसीएसला चौकशीचे आदेश दिले होते. टीसीएसने मागील आठवड्यात आपला अहवाल म्हाडाला सादर केला असून यात ६० उमेदवार दोषी आढळले आहेत. यापैकी काही तोतये उमेदवार असून काहींच्या परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद आहेत. याबाबतचा अहवाल मिळताच म्हाडाने परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आणि या ६० जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हाडाचा तक्रार अर्ज दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, म्हाडाकडून पुणे पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नाही, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.