जळगाव (प्रतिनिधी) : अडीच वर्षांत आमदारांची कामे झाली नव्हती, मतदारसंघात विकासाबाबत जनतेला तोंड दाखविणे अवघड झाले होते. त्यांनी अडीच वर्षांत जी कामे केली नाही, ती आम्ही अडीच महिन्यांत केली. कामे वेगाने होत असल्याने जनता समाधानी आहे. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी केलेले काम, जनतेचा विश्वास त्याची अडीच महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुकीत केलेल्या कामांची पावती मिळाली. आता ते घाबरले. लक्षात ठेवा, ‘ये तो ट्रेलर है, झाकी अभी बाकी है,’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी काळातही विकासाचा आलेख उंचावणार असल्याचे सांगत आपल्या भाषणातून मविआच्या कारभाराचा पंचनामा केला.
कालच ग्रामपंचायतींचे निकाल आले. अडीच महिन्यांत केलेल्या कामाची जनतेकडून पावती मिळाली. आधी कोण सरकार चालवत होते आणि घरी कोण होते, हे जनतेने पाहिले असल्याचा टोला ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळधी येथे जाहीर सभेत लगावला.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावला आगमन झाले. मुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्ह्यातील पाच आमदार गेल्याने शिवसेनेला जिल्ह्यात भगदाड पडले असून जिल्हा चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आणि शहरात आकाशवाणी चौकात प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण चौक भगव्या झेंड्यांनी सजवला गेला होता. भाजपच्या वतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली गेली व बुके देऊन स्वागत केले गेले.
गुलाबराव पाटील यांच्या धरगाव तालुक्यातील पाळधी येथे विश्रामगृहाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभेत जोरदार फटकेबाजी केली.ते म्हणाले की, आम्ही मतदारांची फसवणूक करत नाही. कामाचा खेळखंडोबा करत नाही. प्रत्यक्ष काम करतो. त्याची पावती मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.