Friday, May 9, 2025

पालघर

पालघरमधील जनावरांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव; गुजरातहुन येणाऱ्या वाहतुकीवर बंदी

पालघरमधील जनावरांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव; गुजरातहुन येणाऱ्या वाहतुकीवर बंदी

पालघर (वार्ताहर): देशभरासह राज्यात जनावरांना लम्पीची लागण होत असून आता पालघरमध्ये देखील त्याचे लोण पसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लम्पीचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून गुजरातहून येणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. लम्पीबाबत पशुसंवनर्धन विभागाने सतर्कता बाळगली असली तरी तलासरी, वाडा, वसई आणि उमरोळीत जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्याने धोका वाढत चालला आहे.


पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वाडा येथे एका गाईमध्ये लम्पीची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्वरित परिसरातील एक हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर तपासणी केंद्रे उभारण्यात आली. तसेच महाराष्ट्र व गुजरात सीमेवर जिल्हा असल्याने सतर्कता बाळगत जनावरांची ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली. विविध प्रशासकीय विभागाला जनावरांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. अशात तलासरी, वाडा, वसई, उमरोळी या ठिकाणी एकूण १० जनावरांना लम्पीची लक्षणे आढळल्याने पशुसंवर्धन विभागाने एकूण ७० हजार लसीचा साठा तयार ठेवला आहे. यापैकी ११,८५७ जनावरांचे लसीकरणदेखील करण्यात आले.


वसईत एका गोशाळेत दोन पशूंमध्ये लक्षणे आढळली, त्यामुळे येथील सर्व गाईंना लसीकरण केले गेले आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी एकाच पशूला लम्पी आजराने ग्रासले असताना जिल्ह्यात मात्र आता फैलाव वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण १० जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळली आहेत. यापैकी सात जनावरे सुस्थितीत आहेत; तर तीन जनावरांमध्ये सुधारणा होत असल्याचे पशुसंवर्धन सिभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तर पाच ठिकाणी लम्पीची लक्षणे जनावरांना दिसून आली आहेत. या जनावरांचे नमुनेदेखील पुण्याला पाठवण्यात आले असून लसीकरणाचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. टप्प्याटप्याने लसीकरण करण्यात येत आहे; तर १० पैकी सात जनावरांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा आहे. जिल्ह्यातील गोशाळांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment