मुंबई : घाटकोपरच्या सुधा पार्क परीसरात एक भीषण अपघात घडला असून एका ओला चालकाने आठ जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने उडवल्याने खळबळ उडाली. अनेक जण या अपघातात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी या ओला चालकाला ताब्यात घेतले असून या अपघातामागील नेमक्या कारणांचा खुलासा अद्याप झालेला नाही. ओला चालक हा घाटकोपरच्या कामराज परिसरातील रहिवासी आहे. राजू यादव असे त्याचे नाव आहे.
हा ओला चालक वाहन चालवताना तो नशेत होता की गाडीत तांत्रिक बिघाड झाला, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातानंतर रुग्णालयात आठ जणांना दाखल करण्यात आले आहे, यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. रस्त्यावर चालताना अचानक या चालकाच्या गाडीने वेग घेतला आणि रस्त्यात उभ्या असलेल्या सर्वांना उडवत निघून गेला. या अपघातातील जखमींची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.