Friday, July 11, 2025

जेएनपीएमध्ये १७०० कोटींचे हेरॉइन जप्त; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

जेएनपीएमध्ये १७०० कोटींचे हेरॉइन जप्त; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरातून तब्बल २२ टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची बाजारभाव किंमत तब्बल १७२५ कोटी रुपये असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सदरचा कंटेनर हा एक वर्षांपासून या ठिकाणी असल्याचे समजते.


दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांनी अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यांची अधिक चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचे समोर आले.


त्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचे विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन जेएनपीए बंदरात दाखल झाले. तसेच त्यांनी सांगितलेल्या कंटनेरची तपासणी केली असता, तब्बल २२ टन हेरॉइन सापडले. अंमली पदार्थांचा कंटेनर हा २१ जून २०२१ ला जेएनपीए बंदरात आला होता. तर या बंदरावर दोन दिवसांपूर्वी रक्तचंदनाचा मोठा साठा पकडण्यात आला होता. त्यानंतर लगेच ही मोठी कारवाई झाली आहे. यामुळे जेएनपीए हे तस्करांचा प्रमुख अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment