नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला आशिया चषक स्पर्धेकरिता भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ही स्पर्धा १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत बांगलादेशमध्ये होणार आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकाचा किताब पटकावला आहे. यंदा सातव्यांदा भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ २७ किंवा २८ सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.
२०१२ पासून महिला आशिया कप स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी म्हणजेच २०१८मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत बांगलादेशने अंतिम विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. आतापर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचा किताब जिंकला आहे.