डॉ. सुकृत खांडेकर
गोवा विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे भक्कम बहुमत आहेच, तरीही काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आणि काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये सामील झाले. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चालू असतानाच गोव्यातील पक्षाचे आमदार भाजपमध्ये गेले. काँग्रेस पक्षात पडलेली फूट ही केवळ गोव्यापुरती मर्यादित नाही, तर या घटनेतून सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घंटा वाजू लागली आहे. भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा कमी मतांनी गमावल्या अशा देशातील एकशेवीस लोकसभा मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यात गोव्यातील मतदारसंघाचा समावेश आहे. म्हणूनच गोव्यातील काँग्रेस फुटीचे धागेदोरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहोचले आहेत. गोव्यात भाजपचे बहुमताचे सरकार आहे. अन्य पक्षातील आमदारांची भाजपला सरकार टिकविण्यासाठी मुळीच गरज नाही. पण काँग्रेस देशपातळीवर दुर्बल होत आहे, असे यानिमित्ताने दिसून आले. गोव्यातील काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेसकडे आता केवळ तीनच आमदार उरले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये गेले असे ढोबळमानाने दिसत आहे. पण फुटलेले काही आमदार खाण उद्योग आणि जमीन खरेदी-विक्री व्यवसायात गुंतलेले आहेत. लोकसभा निवडणूक एकोणीस महिन्यांवर असली तरी भाजपने आतापासूनच निवडणूक लढाईची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला केंद्रात विजयाची हॅटट्रीक करायची आहे. गेल्या निवडणुकीत कमी मताधिक्क्यांच्या अंतराने भाजपचा जिथे पराभव झाला, अशा एकशेवीस जागांवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. त्या जागांवर आतापासून मेहनत केली, तर त्या जागा जिंकणे शक्य होईल, असा विश्वास भाजपला वाटतो. त्यातलीच एक जागा ही दक्षिण गोवा मतदारसंघ आहे. भाजपने सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात विजय मिळवला होता, पण २०१९ मध्ये ही जागा भाजपला गमवावी लागली. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघावर भाजपचे, तर दक्षिण गोवा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व मानले जाते. २०२४ मध्ये गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून भाजपला विजय मिळवायचा आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये जे काही संघटनात्मक मोठे निर्णय घेतले जात आहेत ते २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन घेतले जात आहेत.
काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. त्यामागे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यामध्ये भाजपला कोणतीही अडचण येऊ नये हे प्रमुख कारण आहे. काँग्रेसकडे आता जेमतेम तीन आमदार उरले आहेत आणि संघटनाही विस्कळीत आहे, मग भाजपला गोव्याच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात हा पक्ष कसा रोखू शकेल? माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माइकेल लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक, रोडोल्फो फर्नांडिस, संकल्प आमोणकर, देलिया लोबो, इलेक्सो स्वाइरिया हे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. दिगंबर कामत यांनी केलेल्या जमिनींच्या व्यवहारावर टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्ट्रीचे लक्ष होते. त्यांचे गैरव्यवहार बाहेर येतील या भीतीने ते भाजपमध्ये गेले असावेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माईकल लोबो व देलिया लोबो जमिनीच्या व्यवहारांशी निगडित आहेत. हे दोघेही सन २०१२ व २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. २०२२ मध्ये त्यांना जिथून उमेदवारी मिळत होती, तेथून निवडणूक जिंकणे सोपे नव्हते. म्हणून ते काँग्रेसमध्ये सामील झाले. ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडणूक जिंकले, पण सत्तेपासून दूर राहिले. काँग्रेस सत्तेवर येऊ शकली नाही म्हणून ते भाजपमध्ये सामील झाले. सत्ता नसेल तर जमिनीचे व्यवहार व व्यवसाय करणे कठीण होते हे कुणी वेगळे सांगण्याची गरज नाही. काँग्रेसचे अकरापैकी आठ आमदार फुटले म्हणजे दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले म्हणून त्यांच्या फुटीला कायदेशीर मान्यता मिळाली. पक्ष बदलूनही त्यांची आमदारकी कायम राहिली. गेल्या दोन महिन्यांपासून ऑपरेशन काँग्रेस चालू होते. दोन तृतीशांय फुटीला आवश्यक एवढे आठ आमदार पक्षातून बाहेर पडायला तयार झाले, तेव्हाच पक्षाला खिंडार पडले. मायकल लोबो व दिगंबर कामत यांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
दिगंबर कामत यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू झाली. आता ते भाजपचे आमदार बनले आहेत. त्यांनी मडगावमध्ये भाजपचे मनोहर आजगावकर यांचा पराभव केला. १९८९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले. १९९४ मध्ये ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी कामत यांच्याबरोबर भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनीही निवडणूक जिंकली होती. सन २००५ मध्ये कामत यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व काँग्रेसची सत्ता आल्यावर त्यांच्यावर खाण मंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. सन २००७ ते २०१२ या काळात ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. २०१२ मध्ये निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि कामत यांच्यावर ईडीची चौकशी सुरू झाली. मात्र आजपर्यंत त्यांच्यावरील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सन २०२२ च्या निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले. कामत यांनी १० जनपथशी जवळीक निर्माण केली. भाजपमध्ये आल्यावर त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल हे लवकरच समजेल. पण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठपैकी दोन आमदारांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये गेल्यानंतर दिगंबर कामत म्हणाले, मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा एकदा देवाला कौल लावला. माझे गाऱ्हाणे मांडले. देवाला परिस्थिती सांगितली. तेव्हा देवाने मला, तू हवा तसा निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगितले…. राजकारणात परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागतात. मी माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने मी प्रभावित झालो आहे. देशाचा सार्वांगीण विकास होईल, असा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. गोव्यात लोकसभेच्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा अशा दोन जागा आहेत.
१९८० पासून भाजप या दोन्ही जागा लढवत आहे. पण १९९९ मध्ये प्रथमच भाजपला यश मिळाले व तेव्हापासून दोनपैकी एका जागेवर भाजपचा खासदार निवडून येत आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपला विजय मिळाला होता. मात्र २०१९ मध्ये दक्षिण गोवा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या खात्यात जमा झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सतरापैकी पंधरा आमदारांनी पक्षाला राम राम केला. बहुतेक आमदारांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. पक्षाच्या ३७ उमेदवारांना आपण पक्षाशी प्रामाणिक राहू असे म्हणत मंदिर, चर्च आणि दर्गा यांची शपथ घ्यायला लावली. एकदा तर राहुल गांधी यांच्यासमोरच हा शपथविधी कार्यक्रम झाला. तरीही काँग्रेसमधील फूट कोणी रोखू शकले नाही.
सन २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १३ व काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. काँग्रेसपेक्षा चार आमदार कमी निवडून आले असतानाही भाजपने गोव्यात सरकार स्थापन केले व त्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचे समर्थन मिळवले होते. गोव्यात १९९९ मध्ये भाजपने पहिल्यांदा सरकार स्थापन केले तेव्हा मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतर २००२, २०१२ व २०१७ अशी चौथ्यांदा भाजपची गोव्यात सत्ता आली. गोव्यात तब्बल पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला गेली तेरा वर्षे भाजपने मागे टाकले आहे.