नाशिक (प्रतिनिधी) : आदिवासी विभागाच्या हरसूल येथील सेंट्रल किचनच्या कामाच्या कंत्राटात २८ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्यावर अखेर विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बागुलच्या निलंबनाचे आदेश आठवडाभरापूर्वी निघाले असताना नाशिकच्या बांधकाम विभागाने ते दडवून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे.
त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील मुलींच्या सेन्ट्रल किचनच्या कामासाठी १२ टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. बागुलला अटक झाल्यानंतर बांधकाम तसेच आदिवासी विभागात खळबळ उडाली होती. अटकेत असलेल्या बागुल यांच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती मोठे घबाड लागले होते.
अटक झाल्यानंतर बागुल हे तीन दिवस पोलीस कोठडीत होते. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. विशेष म्हणजे बागुलच्या निलंबनाचे आदेश मंत्रालयाने आठवडाभरापूर्वीच दिले असतानाही नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ते दडवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. अटक झाल्यानंतर त्यांना लागलीच निलंबनाचे आदेश काढणे महत्वाचे होते. मात्र तसे झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर मंत्र्यालायातून आठवडाभरा पूर्वीच निलंबनाचे आदेश काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र इकडे कार्यवाही उशिरा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.