Wednesday, April 30, 2025

महामुंबई

स्वाईन फ्लू’ची साथ ओसरतेय; १८ दिवसांत मलेरियाचे ३९८ रुग्ण

स्वाईन फ्लू’ची साथ ओसरतेय; १८ दिवसांत मलेरियाचे ३९८ रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांची संख्या मोठी होती. मात्र आता मुंबईत ‘स्वाईन फ्लू’ची साथ ओसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

यंदा मुंबईत स्वाईन फ्लू चांगलाच फोफावला आहे. मात्र यंदा सप्टेंबरच्या १८ तारखेपर्यंत मुंबईत ६ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात स्वाईन फ्लूचे १८९ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसले. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले. २०२१ मध्ये स्वाईन फ्लूचे ६४ रुग्ण आढळले, तर यावर्षी १८ सप्टेंबरपर्यंत ३०४ रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्याची आकडेवारी पाहता हळूहळू स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या कमी होत आहे.

महिनाभरात १८ सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या ३९८ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात मलेरियाचे ७८७ रुग्ण आढळले होते. त्या पाठोपाठ डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी देखील मोठी आहे. सध्या १८ दिवसांत १३९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात १६९ रुग्ण होते. त्या पाठोपाठ सध्या गॅस्ट्रोच्या २०८ आणि लेप्टोच्या २७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर हेपटायटीसचे रुग्णही जास्त आढळले असून ४५ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने डेंग्यू आणि स्वाईन फ्लू संबंधी महत्त्वपूर्ण सूचना मुंबईकरांना केल्या आहेत. कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोड रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

साथीच्या आजारांची १८ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी

साथीचे आजार रुग्णसंख्या

मलेरिया          ३९८ डेंग्यू              १३९ गॅस्ट्रो             २०८ लेप्टो               २७ स्वाईन फ्लू          ६ हेपटायटीस        ४५ चीकनगुनिया       २

Comments
Add Comment