Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीपत्राचाळ भ्रष्टाचारात शरद पवारांचा सहभाग!

पत्राचाळ भ्रष्टाचारात शरद पवारांचा सहभाग!

चौकशी करण्याची भाजपची मागणी

मुंबई : एक हजार कोटींच्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये ईडीने पुराव्यानिशी हे दाखवून दिले असल्याचे भातखळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन कालबद्ध मर्यादेत या संबंधांची चौकशी करावी, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, पत्राचाळ प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी म्हाडा प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत, महाराष्ट्राचे जाणते राजे म्हटल्या जाणाऱ्या नेत्यापर्यंत जात आहेत. अतुल भातखळकर यांनी आपल्या आरोपांसंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्रावरून म्हाडावर बाह्य शक्तीचा दबाव होता, हे स्पष्ट होत असल्याचे भातखळकर म्हणाले. तसेच, मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भात एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यातून शेकडो मुंबईकरांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार होती. मात्र, संजय राऊत यांचे बंधू व गुरुआशिष कंपनीचे प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर बिल्डरांना विकल्याचे समोर आले आहे. यातून जवळपास एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच, शिवसेना नेते संजय राऊतच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड होते, असा आरोपही ईडीने चार्जशीटमध्ये केला असल्याचे भातखळकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -