Sunday, March 16, 2025
Homeदेशआता भारतीयांपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेलाही हवाय ‘कोहिनूर’

आता भारतीयांपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेलाही हवाय ‘कोहिनूर’

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ब्रिटिशांकडे असलेल्या भारताचा ‘कोहिनूर’ हिरा मायदेशी परतावा यासाठी अनेक दशकांपासून मागणी केली जात आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटिश साम्राज्याकडे असलेले इतर देशांमधून नेण्यात आलेले हिरे परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्रिटनने ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ हा हिरा परत करावा, अशी मागणी दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आली आहे.

‘कुलीनन’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा हिरा १९०५ साली दक्षिण आफ्रिकेत उत्खननात सापडलेल्या एका रत्नातून कापण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी राज्यकर्त्यांनी हा हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे सुपूर्द केला होता. दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट स्टार हिरा महाराणीच्या शाही राजदंडावर बसवण्यात आला आहे.

५०० कॅरेटचा हा हिरा परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाइन याचिकेवर ६ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ब्रिटनने केलेल्या हानीची भरपाई करावी, दक्षिण आफ्रिकेतून चोरून नेलेले सोने, हिरे परत करावेत, अशा आशयाचे ट्वीट दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य वुयोल्वेथू झुन्गुला यांनी केले आहे.

कोहिनूर हिरा जगन्नाथ देवस्थानाचा!

ब्रिटिशांकडून भारताचा ‘कोहिनूर’ हिरा मायदेशी परतावा यासाठी अनेक दशकांपासून मागणी आहे. १०५.६ कॅरेटचा ‘कोहिनूर’ हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले. १८४९ साली ब्रिटिशांनी भारतातील पंजाबवर ताबा मिळवल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात सजवण्यात आला, तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटाचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक हिऱ्याच्या मालकीवरून भारतासह चार देशांमध्ये अनेक शतकांपासून वाद सुरू आहेत. जॉर्ज सहावे यांच्या १९३७मधील राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांच्या आई महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी प्लॅटिनम धातूच्या मुकुटामध्ये हा हिरा सजवण्यात आला होता. हा मुकुट लंडन टॉवरमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -