प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीचा अभिमान हा असतोच. ‘घार उडते आकाशी, पण चित्त तिचे पिल्लांपाशी’, या उक्तीप्रमाणे माणूस कर्मभूमीत कार्यरत असला तरी जन्मभूमीशी त्या घटकाची नाळ कधीही तुटत नाही. नारायण राणे आणि कोकण हे एकमेकांशी असलेले अविभाज्य नाते. कोकणच्या विकासाचे पर्व ज्यावेळी सुरू होते, त्यावेळी नारायण राणेंच्या कार्याचा आवर्जून उल्लेख हा होतोच. नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार, असे नारायण राणेंनी जाहीर कार्यक्रमातून ठणकावून सांगितल्याने कोकणच्या भूमीवर विकासाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत कोकणवासीयांना प्राप्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्र विकास घडवू पाहणाऱ्या, रोजगारांच्या संधी देणाऱ्या आणि महाराष्ट्रीय माणसाच्या अर्थकारणाला हातभार लावू पाहणाऱ्या प्रकल्पांच्या शोधात आहे. या स्वरूपाचे प्रकल्प महाराष्ट्राच्या भूमीवर येऊ पाहत असतील, तर सुविधांच्या पायघड्या अंथरण्याची आता महाराष्ट्र सरकारची आणि महाराष्ट्रीय जनतेची मानसिकता आहे व पुढाकार घेण्याची तयारी आहे. ‘वेदांता’ गुजरातमध्ये गेल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ सुरू झालेला आहे. अर्थात शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे सध्या विरोधकांकडे काहीही राहिलेले नाही. शिंदे-फडणवीस या जोडगोळीने विकासाला पोषक असणाऱ्या निर्णयांचा धडाका लावल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे व बेरोजगारांची माथी भडकवण्याचे काम मविआच्या नेतेमंडळींकडून व पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे. अर्थात यातील सत्य लवकरच बाहेर येईल.
‘वेदांता’ गेल्याचे दु:ख प्रत्येकालाच आहे. प्रकल्प ज्यावेळी येतात, त्यावेळी ते विकासाची पहाट घेऊन येत असतात; परंतु ‘वेदांता प्रकल्प कुठे सुरू करायचा हा त्या त्या व्यवस्थापनाचा निर्णय असतो. कोणतेही राज्य सरकार केवळ सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत असते. त्या त्या प्रकल्पाचे सर्वेसर्वा त्यांना व त्यांच्या धोरणांना अनुकूल ठरणाऱ्या प्रदेशात आपला प्रकल्प स्थिरावण्याविषयीचा निर्णय घेत असतात. अर्थात वेदांता हा जगातला शेवटचा प्रकल्प नाही. त्यामुळे महाराष्ट्रीय जनतेने हताश होण्याचे अथवा मविआच्या अपप्रचाराचा भुलून जाण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वेदांतावरून मविआच्या घटकांनी सुरू केलेला रडीचा डाव व जनसामान्यांच्या दिशाभुलीचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारने केंद्राच्या पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत निदर्शनास आणून दिली. वेदांताहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचा शब्द पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांना दिला आहे. मोदी दिलेला शब्द पाळत असल्याने महाराष्ट्राने त्याबाबत निश्चित असावे; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाणार रिफायनरी कोकणातच होणार असल्याचे ठणकावून सांगितल्याने कोकणच्या विकासाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उद्योजक ज्यावेळी कोणत्याही भागात प्रकल्प आणतो, त्यावेळी तो स्वत:चा नफा गृहीत धरत असतोच. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक, मशीनरी-जागा यामध्ये उद्योजक प्रकल्प सुरू करण्याचे धाडस दाखवितात, त्यांना त्या गुंतवणुकीचा, परिश्रमाचा मोबदला मिळणे स्वाभाविकच आहे. कोकण रेल्वे येण्यापूर्वीची कोकणची परिस्थिती आणि कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतरची परिस्थिती यामुळे झालेला बदल आता महाराष्ट्राला अनुभवयास मिळत आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता तासनतास बसेसचा प्रवास करावा लागत नसून काही तासांच्या कालावधीतच रेल्वेच्या माध्यमातून चाकरमानी आपल्या लाल मातीशी संपर्क करू लागली आहेत. रेल्वे स्थानकांमुळे गृहनिर्माण प्रकल्पाला चालना मिळाली आहे. एकेकाळी वाहनातून येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून राहणाऱ्या कोकणवासीयांना रेल्वेच्या माध्यमातून ताज्या भाज्या काही तासांतच उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आता नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार असल्याने कोकणवासीयांच्या चेहऱ्यावर काही कालावधीनंतर एक वेगळेच समाधानाचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येईल. प्रकल्प ज्यावेळी येतो, त्यावेळी प्रकल्पाच्या यशावर त्या त्या भागातील विकासाचा आलेख उंचावत असतो. हजारो हातांना रोजगार प्राप्त झालेला असतो. त्या त्या भागातील चुली पेटण्याची, उदरनिर्वाहाची समस्या संपुष्टात आलेली असते. अर्थकारणाला गती मिळालेली असते. विरोधकांनीही विरोधासाठी विरोध ही कुपमंडूक प्रवृत्ती बाजूला ठेवून नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात येणार असल्याचे स्वागत करून मोठ्या मनाचे दर्शन घडविणे आवश्यक आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र असल्याने त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार या केलेल्या घोषणेचे मविआच्या घटकांनी मनाचा मोठेपणा दाखवून जाहीरपणे स्वागत करणे आवश्यक आहे. राजकारणात मतभेद असले तरी विकासकामांमध्ये मनोभेद असता कामा नये. विकासकामांमध्ये मनोभेद दाखवून विकासकामांना अडथळा आणणारे घटक हे खऱ्या अर्थांने त्या त्या भागासाठी कलंक असतात. ज्यावेळी प्रदेशाचा विकास होतो, त्यावेळी अडथळ्यांची नाही, तर सामूहिक सहकार्याची गरज असते. नाणार प्रकल्पामुळे कोकणचा कायापालट होण्यास निश्चितच मदत होईल. कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा, सुबत्ता नांदावी. कोकणाला सोडून गेलेला चाकरमानी कोकणात यावा, त्याच्या उद्योग व्यवसायाला कोकणातच बरकत यावी, त्यांना कोकणातच रोजगार प्राप्त व्हावा, असे गेल्या अनेक वर्षांपासून कोकणी माणसाने उराशी स्वप्न बाळगले आहे. कोकणात उद्योग आले, विकासाचे प्रकल्प आले, तरच हे स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवून कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित यावे. नाणार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे. एक प्रकल्प यशस्वी झाल्यास, त्यात कोणतेही अडथळे न आल्यास, अन्य उद्योजकही मोठ्या संख्येने कोकणाकडे वळतील आणि चाकरमान्यांची पावले कायमस्वरूपी कोकणकडे वळतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणवासीयांचे हित डोळ्यांसमोर ठेवून ही भूमिका घेतली आहे. विरोधकांनी कोकणच्या विकासासाठी राजकीय मतभेदाला तिलांजली देऊन अधिकाधिक प्रकल्प कोकणात येण्यासाठी नारायण राणेंच्या भूमिकेचे स्वागत करणे आवश्यक आहे.