Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदिव्यांग असल्याने विमानात प्रवेश नाकारला

दिव्यांग असल्याने विमानात प्रवेश नाकारला

भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी अनुभवला धक्कादायक प्रकार

मुंबई (वार्ताहर) : बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघालेल्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला आहे. बाली येथे २० ते २४ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत असून या स्पर्धेत भारतासह जगभरातील १६ देश सहभागी होणार आहेत.

९५ टक्के दिव्यांग असलेले अरविंद प्रभू व्हीलचेअरवर असतात. परदेशात विमानाने जायचे असेल तर त्यांच्याबरोबर अटेंडंट घेऊनच ते प्रवास करतात. पिकलबॉलच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रात्री बालीला रवाना झाला. अरविंद प्रभू आणि त्यांच्या चार अटेंडंटचे खेळाडूंच्या विमानानंतर एका तासाने रात्री १.२५ चे विमान होते. त्यासाठी ते शनिवारी रात्री १० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. चेकिंग काउंटरवर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने प्रभू यांचा बोर्डिंग पास न देता त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांचे बोर्डिंग पास दिले. लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर नसल्याचे सांगत प्रभू यांना प्रवास करता येणार नाही, असे व्हिएतनामच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

अरविंद प्रभू यांनी या प्रवासासाठी पाच लाख रुपये खर्च केले होते. विमानात प्रवेश नाकारल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले असता रीतसर तक्रार करा त्यानंतर बघू असे सांगण्यात आले. इतर चार जणांना आम्ही प्रवास करण्यास अडवले नव्हते. त्यामुळे त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत, असे उत्तर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने दिल्याचे अरविंद प्रभू यांनी सांगितले.

मी मागील ३५ वर्षांत अनेक देशांचा प्रवास केला आहे. दिव्यांग असल्याने मला नेहमी अटेंडंट घेऊन जावे लागते. त्यामुळे मी लो कॉस्ट एअरलाइन्सनेच प्रवास करतो. याआधी मला कधीच विमान प्रवासापासून रोखण्यात आले नसल्याचे अरविंद प्रभू यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -