Thursday, June 12, 2025

बारामतीच्या महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू

बारामतीच्या महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले त्यांचे बाळ पोरकं झाले आहे.


प्रसुती झाल्यानंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारांसाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना आज (२० सप्टेंबर) पहाटे त्यांचे निधन झाले.


शीतल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ असा परिवार आहे.


दरम्यान, सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातच पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. या महिन्यातच शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या ४१ रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचे ५०९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे पुणे महापालिका हद्दीत एकही मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment