नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांना जर आज कोणाचा सर्वात मोठा धोका असेल, तर ती नव्या युगातील डिजिटल माध्यमे नाहीत, तर प्रसारमाध्यमांना मुख्य धोका या वृत्त वाहिन्या स्वतः आहेत. खरी पत्रकारिता सत्याचा सामना करणे, सत्य लोकांसमोर आणणे आणि आपल्या व्यासपीठावर दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची समान संधी देणे ही असते. ध्रुवीकरण करणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमामुळे वाहिन्यांची विश्वासार्हता कमी होते, मोडतोड न करता केवळ बातम्यांचे वृत्तांकन करणे हेच पत्रकारांचे कर्तव्य असते, असे प्रतिपादन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या २० व्या बैठकीचे आणि ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव, अपूर्व चंद्रा आणि एआयबीडीच्या संचालक फिलोमेना नानाप्रगासम उपस्थित होत्या.
चर्चात्मक कार्यक्रमात अशा वक्त्यांना बोलावणे, जे ध्रुवीकरण करतात, खोटे, दिशाभूल करणारे समज पसरवतात, जे अशा वादविवादात बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, अशा लोकांमुळे वाहिन्यांची विश्वासार्हता कमी होते, असे मत अनुराग ठाकूर यांनी मांडले. ‘वक्ते कोण असावेत, कार्यक्रमाचा सूर कसा असावा, दृश्य कशी असावीत याबद्दलचे तुमचे निर्णयच, प्रेक्षकांच्या मनात तुमच्याविषयीची विश्वासार्हता निश्चित करत असतात. कदाचित, एखादा प्रेक्षक, मिनिटभर तुमची चर्चा बघण्यासाठी थांबेलही, मात्र तो कधीही तुमच्या सूत्रसंचालक/निवेदकावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या वाहिन्या किंवा ब्रँड विश्वासार्ह आणि पारदर्शक बातम्या देणारा स्त्रोत आहे, असे त्याला कधीही वाटणार नाही.” असे ते पुढे म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली २०२१ आणि २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रेडिओ टेलिव्हिजन ब्रुनेईला २०२१ साठीचा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर २०२२ चा प्रशंसा पुरस्कार अर्थव्यवस्था, नागरी सेवा, दळणवळण, गृहनिर्माण आणि समुदाय विकास मंत्रालय, फिजी प्रजासत्ताक आणि फिजी प्रसारण महामंडळाला विभागून देण्यात आला. २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार कंबोडियाचे माहिती आणि दळणवळण मंत्री खियू खानहरिथ यांना प्रदान करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेचे (एआयबीडी) अध्यक्ष मयंक अग्रवाल यांना २०२२ साठीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.