सदगुरू वामनराव पै
परमेश्वर हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. माझ्याबद्दल लोक काही काही आवई उठवतात. वामनराव पै नास्तिक आहेत. वामनराव पै परमेश्वर मानत नाहीत. “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हा माझा सिद्धांत ऐकतात व ठोकून देतात की वामनराव पै नास्तिक आहेत. मला हे सांगायचे आहे की, वामनराव पै पक्के आस्तिक आहेत. बाकीचे कच्चे आस्तिक आहेत व आम्ही पक्के आस्तिक आहोत हे मी वारंवार सांगत असतो. कच्चे आस्तिक म्हणजे काय? जे परमेश्वर आहे असे मानतात ते कच्चे आस्तिक व जे परमेश्वराला अनुभवतात ते पक्के आस्तिक. आम्ही परमेश्वराला अनुभवतो म्हणून आम्ही पक्के आस्तिक आहोत. परमेश्वर हा विषय मला अत्यंत आवडतो व परमेश्वर या विषयावर कितीही बोलले तरी कमीच असे मला होऊन जाते. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो परमेश्वर आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे. “सर्वस्व” हा शब्द लक्षांत ठेवायचा. तो नाही तर आपले जीवनच नाही याला “सर्वस्व” म्हणतात. तो नाही तर आपले जीवनच असू शकत नाही पण याची आपल्याला जाणीव नाही. कारण परमेश्वराबद्दलचे आपल्याला ज्ञान नाही.
परमेश्वराबद्दलचे ज्ञान नसल्यामुळे आज काय झालेले आहे. जगांत लोकांची मजल “परमेश्वर आहे” हे मानण्यापलीकडे जात नाही. लोक परमेश्वराची भक्ती जी करतात ती केवळ भीतीपोटी करतात. केवळ भीतीपोटी परमार्थ करणारे लोक अनेक आहेत. काही लोक सिद्धीसाठी परमार्थ करतात. सिद्धी म्हणजे चमत्कार करण्याचे सामर्थ्य. ही सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी काही लोक परमार्थ करतात. चमत्कार करण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आले की त्यांना असे वाटते की, लोक आपला सन्मान करतील, लोक आपल्याला मान देतील, मोठेमोठे लोक आपल्याकडे येतील असे त्यांना सिद्धीचे एक प्रकारचे आकर्षण असते. चमत्कारांचे आकर्षण हे परमार्थात पडणाऱ्या लोकांना तर असतेच पण इतर लोकांनाही चमत्कारांचे आकर्षण असते. एखादा मनुष्य चमत्कार करतो आहे, असे ऐकले की झुंडीच्या झुंडी तिथे धावत आहेत असे आपल्याला अनुभवाला येते. असे चमत्कार हे प्रत्यक्षात चमत्कारच नसतात असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे व ती वस्तुस्थिती आहे. चमत्कार हे आपल्याला चमत्कार वाटतात जोपर्यंत त्यांच्यामागचे कारण आपल्याला कळत नाही. पण एकदा कारण कळले की, तो आपल्याला चमत्कार वाटत नाही. आपल्याला एखादा जादूगार जेव्हा जादूचे प्रयोग करून दाखवतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते व हा केवढा मोठा माणूस आहे असे वाटते पण जेव्हा तो ते कसे केले हे सांगतो त्यावेळी हा हातचलाखीचा प्रयोग होता हे लक्षांत येते व आपण फसलो कसे याचे आश्चर्य वाटते