मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात नाणार रिफायनरी होणारच आणि तोही कोकणातच होणार, कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का? या प्रश्नावर नारायण राणे यांनी हे उत्तर दिले.
या संदर्भात काही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती राणे यांनी दिली. शिंदे गटालाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी तसेच धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहणार आहे. चांगल्या गोष्टींचे कायम कौतुक करावे, उद्धव ठाकरेंना चांगले बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, माझ्याकडे चांगली वाक्य आहेत, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मातोश्रीच्या कक्षेत
२०२४ ला भाजपचे ४०३ खासदार असतील. गोवा आणि दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असेल. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडले तेव्हाच संपले. उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात कुठेही नाहीत, फक्त मातोश्रीच्या कक्षेत त्यांचे अस्तित्व आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
निरक्षरता कमी करण्यासाठी कामाला लागा
नारायण राणे म्हणाले, ‘लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली, यासाठी उद्योग क्षेत्रात प्रगती होणे गरजेचे आहे. रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे. जीडीपी वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपल्या देशात शिक्षणसंस्था कमी आहेत. माझ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत, तेथे आम्ही दर्जेदार शिक्षण देत असतो. देशात २६ टक्के निरक्षरता तर महाराष्ट्रात १८ टक्के निरक्षरता आहे. निरक्षरता कमी करण्यासाठी कामाला लागा. असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.