Thursday, July 10, 2025

इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे : डॉ. भारती पवार

इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे : डॉ. भारती पवार

नाशिक (प्रतिनिधी) : इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आरोग्य विद्यान विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.


कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, तर प्रमुख वक्ते म्हणून जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे सदस्य मिलिंद थत्ते अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, समन्वयक डॉ. सुनील फुगारे आदींचीहि उपस्थिती होती.


पुढे बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, नव्या पिढीवर देशाचे भविष्य अवलंबून आहे. इतिहासाची माहिती त्यांनी घेतली पाहिजे तरच ते इतिहास घडवू शकतील. देशातील प्रत्येक नागरिकाने समाजहितासाठी कार्य करावे, ज्याची इतिहासात नोंद घेतली जाईल. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य संग्रामात अनेक जनजाती नायकांचे कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासात समाजातील सर्व स्तरातील विशेषतः जनजाती समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जनजाती समाजाने पर्यावरण रक्षणासाठी भरीव कार्य केल्याचे सांगून त्या म्हणाल्या, जल, जंगल व जमीन यांचे रक्षण या जनजाती करतात. वैयक्तीक स्वार्थाचा विचार न करता समाज व राष्ट्रासाठी कार्य करण्याची निस्वार्थ भावना त्यांच्यात असते. हा आदर्श आपणही घ्यावा, जेणेकरुन पुढील पिढीला ते प्रेरणादायी ठरेल. त्सुनामीसारखे नैसर्गिक संकटे असतील किंवा बिष्णोई समाजाने वनरक्षणासाठी केलेला उठाव असेल, बिरसा मुंडा यांची शौर्यगाथा आदी अभिमानास्पद कार्य या समाजाने देशासाठी केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माधुरी कानिटकर म्हणाल्या की, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जनजाती नायकांची स्वातंत्र्यासाठीची संघर्ष कहाणी प्रेरणादायी आहे. राष्ट्रभक्ती व समाजात संघर्षमय चळवळ करताना अनेक जनजाती नायकांनी बलिदान दिले, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे.


विद्यार्थ्यांनी जनजाती नायकांचा आदर्श घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. आयोगातर्फे प्रदर्शन लावण्यात आले असून विद्यार्थी व जनतेला प्रदर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी राष्ट्रीय जनजाती आयोगाला विद्यापीठाचे सभागृह उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून विद्यापीठ परिसर ’ग्रीन कॅम्पस’ मध्ये रुपांतरीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भरत केळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे प्रतिनिधी मिलिंद थत्ते, यांनी जनजाति समाजातील लोकांची कार्य व कर्तृत्व याबाबतीत संशोधन व्हावे, ज्यातून युवा पिढीला नवीन प्रेरणा मिळेल असेही त्यांनी सांगितले.


बाळू घुटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मानले. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगातर्फे पोस्टर स्वरुपात जनजाती नायकांच्या छायाचित्र व थोडक्यात माहितीचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी मांडण्यात आले. सदर प्रदर्शनाचे संयोजन आयोगाचे संयोजक अशोक भुसारे व तुषार मिसाळ यांनी केले आहे.

Comments
Add Comment