पुणे (प्रतिनिधी) : साखर निर्यातीत भारत जगात अव्वल ठरला आहे. साखरेच्या निर्यातीत आपण विक्रम केला असून, दुसरा क्रमांक ब्राझील देशाचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. इतर देशांना मागे टाकून एका राज्याने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हा देखील एक विक्रम झाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याचेही त्यांनी नमूद केले. गायकवाड म्हणाले, साखर उत्पादनात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपण ११२ लाख टन साखर निर्यात केली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ७५ लाख टनांचा आहे. साखर धंद्याला सोन्याचे दिवस आले आहेत.
जागतिक स्तरावर महाराष्ट्र आता निर्यातीत देशात अव्वल ठरला आहे. युरोप, आशियाला निर्यात करण्याचे दरवाजे आपल्यासाठी उघडली आहेत. इथेनॉल निर्मितीवर देखील आपला भर आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यात पुढे आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. तसेच साखर कारखान्यातून पोटॅश निर्मितीही केली जात आहे. साखर कारखाने इंधनाचे कारखाने म्हणून पुढे येऊ लागली आहेत. जगातले साखरेतील आयएसओचे केंद्र महाराष्ट्रात यावे यासाठी आता पुढाकार घ्यायला हवा, असे गायकवाड यांनी सांगितले.