मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र असून भाजपनेही अनेक ठिकाणी मुसंडी मारली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीला जनमताचा कौल!
भाजपा – २७४
शिवसेना (शिंदे गट) – ४१
राष्ट्रवादी काँग्रेस – ६२
काँग्रेस – ३७
शिवसेना (उध्दव गट) – १२
राज्यात रविवारी १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सरशीमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे दिसून आले.
पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिंदे गटानेही काही ठिकाणी विजय मिळवला आहे. तर स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबिज केली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये बाजी मारल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये एकूण ८८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. त्यानंतर शिवसेनेने १३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपकडे पाच तर काँग्रेसकडे चार ग्रामपंचायती गेल्या आहेत.
पुणे जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे ३० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर प्रमुख विरोधक भाजपला केवळ तीन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तर स्थानिक आघाड्यांनी २३ ठिकाणी सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरपंचपदासाठीदेखील राष्ट्रवादीने ३० ठिकाणी विजय मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून ७० पैकी ३३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या हाती आल्या आहेत.
जळगावात शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे पाहावयास मिळाले. भाजप आणि काँग्रेसला १३ पैकी एकाही जागेवर सत्ता मिळाली नाही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील ११ तर यावल तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत २० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपने १६ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकमेव कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाने बाजी मारली.
धुळ्यात कमळ फुलले
धुळ्यात ३२ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. धुळे जिल्ह्यात भाजपने ३३ पैकी ३२ जागांवर कमळ फुलविले आहे. तर फक्त राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
नंदुरबारमध्ये भाजपचे वर्चस्व
नंदुरबारमध्ये भाजपने बाजी मारली आहे. नंदुरबारमध्ये झालेल्या ७५ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. तर शिवसेना (शिंदेगट) २८, अपक्ष ४ व राष्ट्रवादी १ आणि लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहे.