कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या आनुषंगाने मंदिर स्वच्छतेसह दर्शन रांग आणि सुरक्षा याचे नियोजन सुरू असून यंदा भक्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पेड ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान अंबाबाई मंदिर २१ तारखेला दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार असून नवरात्रोत्सवाच्या उत्सव, तयारीसाठी २१ सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन बंद असणार आहे. भाविकांसाठी देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिर येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे, तर रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नवरात्रोत्सव भाविकांना तितक्या उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. भाविकांना यावर्षी उत्साहपूर्ण वातावरण असणार आहे. त्या आनुषंगाने नवरात्र उत्सवासाठी जोरदार तयारी करण्यात येणार आहे.
यंदा भक्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पेड ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पासची किंमत दोनशे रुपये ठेवण्यात आली असून नवरात्रोत्सवात ज्या भाविकांना रांगेत वेळ न घालवता लवकर दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी ही पेड ई-पासची सोय करण्यात येणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मोफत दर्शन सेवा ही सुरूच राहणार आहे.