
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लम्पीच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण ८२ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात देखील लम्पीचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, राज्यात आतापर्यंत १८७ जनावरे या आजाराचे बळी ठरले आहेत.
जनावरांना होणारा लम्पी हा आजार महाराष्ट्रात अधिक बळावताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांना लम्पी आजाराची लागण होत आहे. एकापाठोपाठ एक अनेक जिल्ह्यांतील जनावरे लंम्पी आजाराची बळी ठरत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८७ जनावरांचा मृत्यू झाला असून २५ जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ४७, अहमदनगर जिल्ह्यात २१, धुळ्यात २, अकोल्यात १८, पुण्यात १४, लातूरमध्ये दोन, सातारा जिल्ह्यात ६, बुलढाण्यात पाच, अमरावती जिल्ह्यात ७, एक व इतर अशा एकूण १८७ संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, वाशीम, नागपूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार सतर्क झाले असून, रोगावर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी आणि विविध उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात लम्पीच्या लसीकरणाला वेगही वाढवण्यात येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक जनावरे दगावत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत. तसेच जनावंराच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.