नाशिक (प्रतिनिधी) : अधिकाधिक नफ्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाईल डीलर्स कडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित डीलर्स विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहरातील मेनरोड परिसरातील वावरे लेन एका खासगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई-मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. संशयिताने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाईलचा पुरवठा केला नाही.
संबंधित मोबाईल कंपनीच्या मुख्य डिलर्सकडे चौकशी केली असता ही बाब उघड झाली. मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकीसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यवसायिकांकडून घेतली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.