नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये कच्चे तेल विकत घेतल्याने भारताला जवळजवळ ३५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळेच आपला व्यापार सुरु रहावा म्हणून रशियाने भारताला स्वस्त दरामध्ये कच्चे तेल विकण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टींचा फायदा भारताला झाल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केले. त्यावेळी जगभरामध्ये तणावपूर्ण राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच रशियाकडे अनेक वर्षांपासून तेल विकत घेणाऱ्या काही देशांनी निर्बंध लादत रशियाकडून तेल घेणे बंद केले.
या निर्बंधांमुळे रशियाला कच्च्या तेलाचे लाखो पिंप निर्यातीसाठी तयार असूनही देशाबाहेर पाठवता आले नाही. त्यामुळेच रशियाने कच्च्या तेलाच्या जगातील दरांपेक्षा बऱ्याच कमी दराने इतर देशांना तेल विक्री करणे सुरु केले. त्यावेळी भारताने अमेरिकेसहीत इतर अनेक देशांकडून दबाव टाकला जात असतानाही रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. सवलतीमध्ये रशियाकडून मिळणारे तेल भारतामध्ये आयात करण्यात आले.