Categories: कोलाज

साहित्यसंगीतकलाविहीन:।

Share

अनुराधा दीक्षित

प्रिया माझी एक कलासक्त मैत्रीण! सगळ्याच प्रांतात तिला रस. काही ना काही तरी उद्योग चालू असतात तिचे. ती कवयित्री आहे, अभिनेत्री आहे, टाकाऊतून टिकाऊ कलात्मक वस्तू बनवते, ती संगीत विशारद आहे… आणखी काय काय सांगू? पण अनेक खडतर प्रसंगातून तिला जावं लागलं. बरेचदा अगदी टोकाचे विचारही क्वचित तिच्या मनात आले. पण आपल्या सकारात्मक विचारांमुळे आजपर्यंत ती सन्मानाने जगतेय. तिनेच मला एकदा एक किस्सा सांगितला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. तिला कुठेतरी एक पुरस्कार मिळाला. तिच्याकडे जाऊन-येऊन प्रवास करण्याएवढे आणि वर थोडेसे किरकोळ ५०-१०० रुपये होते. ती आतापर्यंत अतिशय स्वाभिमानाने जगत आलेली. अगदी बेताची परिस्थिती असली, तरी कुणाकडे कधी हात पसरायची सवय नाही. तर पुरस्कार सोहळ्यानंतर ती जेवून वगैरे मिळेल त्या गाडीने इचलकरंजीहून कोल्हापूरला आली. तिथून खाली कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गाडीने ती येणार होती.

गाडीची चौकशी करण्यासाठी ती कंट्रोल रूमकडे गेली, तेव्हा सहज तिने खांद्याच्या पर्समध्ये रुमाल काढण्यासाठी हात घातला, तर आत ठेवलेली छोटी पैशांची पर्स गायब झालेली. तिला आठवेना आपण कधी बाहेर काढली होती. कारण, येताना नेमके पैसे तिने तिकीट काढण्यासाठी हातात काढून घेतले होते. कोल्हापूर येईपर्यंत ती निश्चिंत होती. फक्त खांद्याची पर्स काढून तिने हातात घेऊन मांडीवर ठेवली. बाहेरून येणाऱ्या वाऱ्याने तिला डुलकी कधी लागली कळली नाही. जाग आली तेव्हा कोल्हापूर जवळ आलं होतं. तिची पर्स मांडीवरून सरकून थोडी बाजूला झाली होती. तिने उतरायच्या तयारीने पर्स खांद्याला लावली. त्यानंतर ती आता उघडली होती.

हातात एक पैसा नव्हता. घरी तर निदान रात्रीपर्यंत पोहोचायला हवंच होतं. मुलगा वाट बघत बसेल, काळजी करील, चिडेल… असे कितीतरी विचार मनात येऊन गेले. पण आता आयत्या वेळी गाडीला पैसे कुठून आणणार? इथे कोणी ओळखीचं नाही. मग तिने मनाचा हिय्या केला. आपल्या वडिलांचं स्मरण केलं. कारण त्यांनीच तिला गाणं शिकवलं होतं. तिने कंट्रोल रूममध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मला थोडा वेळ स्टॅण्डमध्ये बाकावर बसून गाण्याची परवानगी द्या. तिने चक्क आपल्या पुढ्यात एक रुमाल ठेवला आणि सुस्वर आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात येणारी-जाणारी प्रवासी मंडळी तिकडे पाहू लागली, जवळ जाऊन ऐकू लागली. रुमालावर पैसे टाकू लागली. तास-दीड तास झाल्यावर तिने जमलेले पैसे मोजले. ती सावंतवाडी गाडीत बसली. कणकवलीत पोहोचेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. रिक्षावाले बरेचसे घरच्या ओढीने मिळेल ते भाडं घेऊन निघून गेले होते. रिक्षा स्टॅण्ड रिकामाच दिसत होता. एसटी स्थानकापासून २-३ किमीवर घर होतं. तिने आपली खांद्याची पर्स आणि कपड्यांची पिशवी सावरत चालायला सुरुवात केली. मनातल्या मनात ‘शुभं करोति’पासून स्तोत्रं म्हणायला सुरुवात केली. तेवढ्यात एक रिक्षावाला तिच्याजवळ येऊन थांबला. “वयनी, एकट्याच इतक्या रातसर खंय चल्लाव? रिक्षा भेटोक नाय?” तिला ओळखणारा तो रिक्षावाला होता. मग तिने स्टॅण्डवर रिक्षा नसल्याने आपण चालत चालल्याचं, कोल्हापूरहून आल्याचं सांगितलं. त्याने रिक्षात बसायला सांगून घरापर्यंत सोडतो असं सांगितलं. भला माणूस होता. एवढ्या आडरस्त्यावर वाटेत रिक्षा मिळणं कठीणच होतं. त्याच्या रूपात देवच मदतीला धावून आला होता. तिला हायसं वाटलं. तिने त्याला रिक्षाचं भाडं विचारलं. तेवढं देऊन जेमतेम पाच-दहा रुपये तिच्याकडे उरले होते. तेही गाणी म्हणून मिळवलेल्या भिकेतून!

तुमच्याकडे एखादी कला असेल, तर अशीही ती उपयोगी पडते. जीवन जगण्यासाठीही ती उपयोगी पडते. प्रियाच्या वडिलांनीही तिला हेच सांगितलं होतं. तेच तिच्या उपयोगी पडलं. एक सुभाषित आठवले,

‘साहित्यसंगीतकलाविहीन:,
साक्षात् पशु: पुच्छविषाणहीन:।’

म्हणजे साहित्य, संगीत, कला यांचं ज्ञान नसणारा माणूस म्हणजे शेपूट आणि शिंगे नसणारा पशूच होय! कवी पुढे म्हणतो की, जगण्यासाठी तो गवत खात नाही, हे पशूंचे भाग्यच होय! नाहीतर पशू उपाशी मेले असते! साहित्य, संगीत, कला किंवा एखाद्या छंदात रमणाऱ्या माणसांचं आयुष्य कितीही अडचणींनी भरलं असलं, तरी ते सुसह्य होतं. कारण त्यांचं दुःख त्यामुळे हलकं होतं. आतापर्यंत अशी एखादी कला, छंद स्वान्त: सुखाय जपलेली असली, तरी माणसाच्या पडत्या काळात तीच त्याला जगण्याचा मार्ग दाखवते. सध्या ‘आई कुठे काय करते?’ मालिकेतली अरुंधतीच बघा. संसारात पुरती अडकून गेली. नवऱ्याने टाकली. पण स्वत:च्या गायनकलेच्या जोरावर ती परिस्थितीशी संघर्ष करीत स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने उभी राहिली. गायनक्षेत्रात नाव कमावले.

आपल्या लतादीदींच्या खांद्यावर तर वयाच्या तेराव्या वर्षी साऱ्या घराची जबाबदारी पडली. कला, छंद, आवड कोणतीही असो. ती कुठे कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. माझ्या एका भाच्याला लहानपणापासून तबला वाजवायची आवड होती. नंतर एकीकडे शिक्षण करता करता तबलावादक झाला. अगदीच नाही तर स्वयंपाकात सुगरण असणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुषही स्वतःची खानावळ, हॉटेल, एखादी चहा, नाश्त्याची टपरी चालवूनही आपला डगमगणारा संसार उभा करतात. धंद्यात नाव कमावतात. लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणं, ग्राहकांना पुन्हा तिथेच यायला भाग पाडतो, हीदेखील एक कलाच आहे.

कधीतरी गणपती, दिवाळीत दोन-तीन पुरुष हातात तबला, पेटी घेऊन येतात. कन्नड भाषिक आहेत. पण दारोदारी जाऊन एखाद-दुसरं मराठी गाणं, अभंग वगैरे इतकं सुंदर म्हणतात की, वाटतं यांना एखादा चांगला गुरू भेटला असता, तर त्यांनी नाव कमावलं असतं!

कोकणात आंबे पिकतात, नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात असतात. एके काळी या बागांमध्ये राबणारी, झाडांवर चढून फळं काढणारी माणसं सहज उपलब्ध होती. आज ही कला हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या कामांसाठी माणसं मिळत नाहीत. माडांवर चढण्यासाठी आता यंत्रांचा उपयोग केला जातो. ते पैसेही अवाच्या सव्वा मागतात. पण तरीही ते देण्याशिवाय पर्याय नसतो. कारण फळं चांगल्या स्थितीत हाती लागत नाहीत. कधीतरी गळून पडतात. अलीकडे कोकणात आंब्याच्या सीझनला नेपाळहून कामगार आयात करावे लागतात. कारण, ते या कामांमध्ये वाकबगार असतात, स्थानिक सर्वसामान्य मुलांना या कामांची लाज वाटते. दहा-बारा हजारांच्या नोकरीसाठी, व्हाइट कॉलर जीवन जगण्यासाठी मुंबई वा अन्य शहरांकडे धाव घेतात. खरं तर झाडावर चढता येणं हीसुद्धा एक कला आहे. त्यासाठी स्वतःचे हातपाय झाडाला चिकटून, तोल सांभाळत, दमछाक होऊ न देता फांद्या छाटणे, फळं काढणे, माड बेणणे, रोगट फांद्या तोडून त्या दोरखंडाच्या सहाय्याने अलगद खाली उतरवणे हे किती धाडसाचं काम आहे! पण ते सगळ्यांना जमत नाही. म्हणजेच त्यात काहीतरी कौशल्य हवंच ना! अशी कितीतरी कलाकौशल्य सांगता येतील.

अक्षरलेखन करणं… ज्याला कॅलिग्राफी म्हणतात हीसुद्धा एक कला आहे. कथा, कविता, वृत्तपत्रात सदर लेखन वगैरे लेखन करूनही अर्थार्जन करणारे अनेक आहेत. तसेच नाट्य, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी इ. क्षेत्रांतही अनेक कलाकार, लेखक, कवी, तंत्रज्ञ आज नाव कमावून आहेत. ते लोकांचं मनोरंजन करतातच, पण स्वतःचं जीवनमानही उंचावतात. म्हणूनच लहानपणी केवळ हौस, छंद म्हणून जपलेली गोष्ट तिचं संगोपन, जतन करून वाढवली पाहिजे. पुढच्या आयुष्यात कोण जाणे त्यांचा आपल्याला कसा उपयोग होईल सांगता येत नाही. नीरस, नकारात्मक, रटाळ, अर्थशून्य आयुष्य जगायचं नसेल, तर कोणता तरी छंद, कला नक्कीच जोपासा. नाही तर केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे,

“आम्हाला वगळा,
गतप्रभ झणी होतील तारांगणे,
आम्हाला वगळा,
विकेल कवडीमोलावरी हे जिणे।”
हे खरं झालेलं दिसेल!

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

4 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

5 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

5 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

5 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

6 hours ago