Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरकावळ्यांची संख्या घटली; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले

कावळ्यांची संख्या घटली; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले

वसंत भोईर

वाडा : कधीकाळी शहरासह गावखेड्यात प्रत्येक वस्तीत सकाळ, सायंकाळ कावळ्यांची काव… काव… ऐकू येत असे. परिसरातील मोठ्या झाडांवर तर कावळ्यांची शाळाच भरायची. पण सध्या ग्रामीण भागासह शहरात कावळे दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले आहेत.

११ सप्टेंबरपासून पितृपक्षात सुरुवात झाली आहे. पितृपक्षात कावळ्यांना श्राद्धभोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरूड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला, तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. नदीकिनारी असलेल्या दहन घाटांचा अपवाद सोडला, तर वस्त्यांमध्ये सहसा कावळे पाहायला मिळत नाहीत.

वाढत्या बांधकांमामुळे झाडे तोडण्यात आली. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. गर्दीच्या भागात तर कावळ्यांसह इतर पक्षीही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे पितृपक्षात अन्नघास भरवण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ज्या भागात मोठ्या वृक्षांची संख्या जास्त असते, तेथे कावळे दिसून येतात. बांधकामांसाठी व जंगलातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे कावळ्यांनीही आपला आधिवास बदलला आहे. शिवाय कावळ्यांसह पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या चिंताजनक आहे. – श्रीकांत ढालकर, पक्षीमित्र

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -