अनुराधा परब
देहाशिवाय आत्म्याला स्वतंत्र अशी ओळख नसते. त्याच निर्विकार, निर्लेप आत्म्याच्या मृत्यूपश्चात स्थित्यंतराच्या कल्पनेवर आधारित अनेक संस्कार अस्तित्वात आले. संस्कारांची संस्कृती झाली, त्याला धर्माची जोड मिळाली. “पुनरपि जननं पुनरपि मरणं…” यावर विश्वासून मरणानंतर देहातील आत्म्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग, नरक प्राप्त होतो, या धार्मिक समजुतीलाही बळकटी आली. स्वर्गात जाणे, मर्त्यलोकी परतणे याला उपनिषदांमध्ये पितृयान म्हटलेले आहे, तर जीव ज्या मार्गाने जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमस्वरूपी मुक्त होतो, त्याला देवयान असे संबोधण्यात आले आहे. अपरपक्षात अर्थात पितृपक्ष किंवा महालय पक्षात यमलोक सोडून मृत्यूलोकी येणाऱ्या पितरांच्या शांती तसेच संतुष्टीसाठी म्हाळ घालण्याची रित आहे. संस्कृतीमध्ये परंपरेने चालत आलेल्या नीतीनियमांप्रमाणे योग्य अशी गोष्ट किंवा वर्तन करणे श्रेयस्कर मानले गेले आहे. म्हाळ हा त्याच श्रेयसाचे कृतीरूप आहे.
म्हाळ, महालय सर्वत्र सारखेच असले तरीदेखील प्रत्येक जाती, समाजानुसार, परंपरेनुसार त्यात काही ना काही त्यांचे असे विशेष विधी असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गोसावी, धनगर आदी समाजातील म्हाळाचे स्वरूप थोडे वेगळे आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात धनगर समाजाची वस्ती आहे. या समाजातील म्हाळाविषयी प्रकाश शिंदे माहिती देतात. प्रतिपदेच्या म्हाळाला आन्सुट म्हणतात, तर सप्तमीचा म्हाळ घालायचा झाल्यास तो म्हाळ सप्तमी की नवमीला घालायचा, याची कुलदेवतेकडे विचारणा करावी लागते. मृत व्यक्तीचे वर्ष होण्यापूर्वी कौल घेण्याची तशी आवश्यकता नसते. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षीपासून मात्र प्रत्येक आडनावांच्या कुलदैवताला कौल लावल्याशिवाय म्हाळ घालता येत नाही. आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी घातल्या जाणाऱ्या म्हाळाला घायली (घायाळ)चा म्हाळ (सर्वपित्री अमावस्या) म्हणतात. कुटुंबातील सवाष्ण निधन पावलेली असल्यास तिच्यानंतर निधन पावलेल्यांचा म्हाळ नवमीवरच थांबतो. साधारणपणे आन्सुट, पंचमी, सप्तमी, नवमी आणि बारसी असे म्हाळ (सवाष्ण घरातील निधन पावलेली नसेल, तर) घातले जातात. म्हाळासाठीच्या जेवणकाराला धनगरांमध्ये पाचकार म्हटलं जातं. चांद्रवंशीय धनगरांकडचे म्हाळ रात्रीचे वाढले जाण्याची खरी पूर्वपरंपरा आहे. आताच्या काळात सोयी आणि ठिकाणाप्रमाणे त्यात बदल झाले आहेत. म्हाळामध्ये केल्या जाणाऱ्या विधींना धनगरांमध्ये “सपळोक” म्हणतात. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि सून यांनी पिंडादी विधी करायचे असतात. यावेळी यजमान घराच्या पायरीवरच दोन्ही हात कातरीसारख्या स्थितीत ठेवून पाणी, दूध वा दह्याने पाचकाराचे पाय धुतो.
त्याच्या कपाळाला गंधाक्षता लावून त्याच्या डोक्यावर तवशीची फुलं टाकून स्वागत करतो. त्याच्या डोईला पागोटं बांधून त्यात ती फुलं खोवली जातात. कुमारवयीन मुलासाठी लिंबा पाचकार ठेवला जातो. धनगरांमध्ये कोणत्याही विधींसाठी ब्राह्मण लागत नाही, तर समाजातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा लांबर हे ते विधी करतात. त्यांना या समाजात भट समजलं जातं. म्हाळाची वाडी (नैवेद्य) ही संपूर्ण शाकाहारी असते. त्यादिवशी मांसाहार शिजवलाही जात नाही. जेवणापूर्वी कुलदेवतेला उद्देशून प्रार्थनेची सुरुवात होते. म्हाळात “यजमानांनी केलेल्या गोष्टी पितरांनी मान्य करून घ्याव्यात, चुकलं माकलं सांभाळून घ्यावं आणि कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी कायम राहावी”, अशी विनंती केली जाते.
गोसावी समाजातील म्हाळाच्या परंपरेविषयी गंगाराम सखाराम गोसावी यांनी माहिती देताना म्हणाले की, वडिलांच्या मृत्यूच्या तिथी दिवशी सर्व पितरांच्या नावाने सगोत्राव्यतिरिक्त अन्य गोत्रातील व्यक्तींना बोलावून पितर म्हणून त्यांना जेवण घातले जाते. सिंधुदुर्गातल्या नाथपंथी गोसावी यांच्यात ब्राह्मण न बोलावता स्वतःच्या पद्धतीप्रमाणे पिंडदानाचा विधी करतात. वर्षभरात निधन पावलेल्यांच्या तिथीला प्रत्येक महिन्याला मासिक पान दिलं जातं. कार्यानंतर पहिल्यांदा येणारा भरणी (स्त्रियांचा म्हाळ) वा आन्सुट (पुरुषांचा म्हाळ), सवाष्णीचा म्हाळ अहेव (अविधवा) नवमीला घातला जातो. वर्षश्राद्धानंतरच्या वर्षापासून गेलेल्यांच्या तिथीला म्हाळ घातला जातो. म्हाळातील जेवणकारांची संख्या कुटुंबाप्रमाणे वेगवेगळी असते. देवाच्या नावाने निमा (अविवाहित) तसेच आकुवारी (कुमारी) जेवणकार ठेवण्याची रीत आहे. नाथपंथाचा दीक्षान्त विधी झालेला मुलगा निधन पावल्यास त्याचा जेवणकार ठेवावाच लागतो. महालयाप्रसंगी जेवणकारांचे उंबरठ्याबाहेर पाट ठेवून त्यांचे पाय धुतले जाऊन, गंधाक्षात फुले देऊन त्यांना घरात घेतले जाते. घरात प्रवेश करण्यापूर्वी जेवणकार हातातील गंधाक्षता वगैरे घराच्या नळ्यांवर (छपरावर) टाकून मगच घरात येतात.
जेवणापूर्वी “पूर्वापार चालीरितीप्रमाणे केला जाणारा पिंडदानाचा विधी मान्य करून पावन करून घ्या. चूक झाली असल्यास क्षमा करा आणि जेवणाला बोलावलेल्या व्यक्तींनी जेवून तृप्त होऊन आशीर्वाद द्यावेत, कृपादृष्टी ठेवावी”, अशी प्रार्थना केली जाते. जेवणकाराला जेवणानंतर विडादक्षिणा देण्याची परंपरा सर्वत्र सारखीच आहे.
महालय संकल्पना एकच असली तरी त्याला विविध समाजातील रीतीभातींचे वेगवेगळे सांस्कृतिक अस्तर आहे. काही ठिकाणी म्हाळाच्या वेळी कुळी सांगण्याचीही परंपरा आहे. कुटुंबातील पूर्वजांविषयीची माहिती सांगण्यातून त्यांच्या आठवणी जागवणे, हाच त्याचा हेतू असतो. कुळी सांगणारी मंडळीसुद्धा वेगळी असतात. याशिवाय मोक्षपदाला नेणारा डांक विधी हासुद्धा कुंभ – सृजनतत्त्वाशी संबंधित तसंच जन्म-मृत्यूचे रहाटगाडगे या संकल्पनेच्या जवळ जाणाऱ्या सिंधुदुर्ग संस्कृतीचा वेगळा विशेष आहे.
मृत व्यक्तीला मुक्ती मिळण्यासाठी कुंभाराकडून क्रिया करवून घेताना डांक वाद्य वाजवण्याची परंपरा कोकणात पाळली जाते. या परंपरेमध्ये आपल्याला जे प्रिय ते करण्यापेक्षा पूर्वजांना, पितरांना जे प्रिय ते करण्याकडे कल असतो. त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या वार्षिक दिवसांमध्ये त्यांना अन्नग्रहणादि गोष्टींनी संतुष्ट करणे हेच त्यावेळी म्हाळ घालणाऱ्यांसाठीचे प्रेयस असते. ज्यांच्यामुळे जगण्याच्या परंपरेचा, कुटुंबाच्या वारशाचा एक घटक झालो आहोत, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगत भौतिक जीवन उपभोगत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हेच संस्कृती अधोरेखित करते.