
मुंबई (वार्ताहर) : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १८ सप्टेंबर २०२२ रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील. तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप-डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल सेवा रद्द राहतील.
ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
https://twitter.com/Central_Railway/status/1570744322588393477